Saturday , August 22 2026
Breaking News

आश्वासनाची आठवण; मराठी परिपत्रके, फलकांसाठी महाराष्ट्र एकीकरण समितीची जिल्हाधिकाऱ्यांकडे पुन्हा धाव

Spread the love

 

बेळगाव : मराठी परिपत्रके आणि शासकीय कार्यालयांवरील मराठी फलकांच्या अंमलबजावणीबाबत दिलेल्या आश्वासनाची पूर्तता करावी, तसेच आतापर्यंत झालेल्या कार्यवाहीची माहिती द्यावी, या मागणीसाठी मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या शिष्टमंडळाने मंगळवारी जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांची पुन्हा भेट घेत निवेदन सादर केले.

समितीचे अध्यक्ष प्रकाश मरगाळे यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांना २२ जून रोजी काढण्यात आलेल्या मोर्चानंतर दिलेल्या आश्वासनाची आठवण करून दिली. मराठी परिपत्रके आणि फलकांच्या प्रश्नावर समिती स्थापन करून सकारात्मक निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन त्यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी दिले होते. या आश्वासनाच्या पूर्ततेसाठी समितीने प्रशासनाला दहा दिवसांची मुदतही दिली होती.

मात्र, मुदत संपूनही कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नसल्याने समितीने पुन्हा जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेत मराठी परिपत्रके व मराठी फलकांची अंमलबजावणी तातडीने करण्याची मागणी केली. तसेच या संदर्भात आतापर्यंत प्रशासनाने कोणती पावले उचलली, याची माहितीही देण्याची विनंती निवेदनाद्वारे करण्यात आली.

यावेळी जिल्हाधिकारी रोशन यांनी निवेदन स्वीकारून उपमुख्यमंत्री यांच्या आगामी बेळगाव दौऱ्याच्या तयारीमुळे पुढील दोन दिवस व्यस्त असल्याचे सांगितले. दौरा संपल्यानंतर महाराष्ट्र एकीकरण समितीच्या प्रतिनिधींना चर्चेसाठी बोलावून या विषयावर योग्य ती कार्यवाही करण्यात येईल, असे आश्वासन त्यांनी दिले.

या प्रसंगी प्रकाश मरगाळे यांच्यासह कार्याध्यक्ष माजी आमदार मनोहर किनेकर, एम. जी. पाटील, प्रकाश गडकरी तसेच समितीचे अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

कॅपिटल वन संस्थेला २१.६५ लाखांचा विक्रमी नफा; सभासदांना ८ टक्के लाभांश

Spread the love  बेळगाव : कॅपिटल वन या संस्थेची १८ वी वार्षिक सर्वसाधारण सभा श्री …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *