Friday , August 21 2026
Breaking News

शैक्षणिक वर्षाचा महिना उलटला; ९ हजार शिक्षक भरतीचा अजूनही पत्ता नाही

Spread the love

 

बेंगळूरू : नवीन शैक्षणिक वर्षाला प्रारंभ होऊन महिन्याचा कालावधी उलटला असला, तरी राज्यातील ९ हजार शिक्षक भरती प्रक्रियेला अद्यापही मुहूर्त लागलेला नाही. शैक्षणिक वर्ष सुरू होण्यापूर्वीच राज्य सरकारने ९ हजार शिक्षकांची भरती पूर्ण करण्याची घोषणा केली होती. मात्र प्रत्यक्षात शाळा सुरू होऊन महिना उलटूनही भरतीसंदर्भात कोणतीही ठोस हालचाल दिसून येत नसल्याने यंदाही शिक्षक भरतीबाबतचा संभ्रम कायम आहे.

गेल्या काही महिन्यांपासून सरकारकडून शिक्षक भरतीबाबत वारंवार घोषणा करण्यात आल्या. लवकरच अधिसूचना प्रसिद्ध केली जाईल, असेही सांगण्यात आले होते. मात्र आजपर्यंत भरतीची अधिसूचना, वेळापत्रक, जिल्हानिहाय पदसंख्या, आरक्षणाचा तपशील किंवा पात्रतेसंदर्भातील अधिकृत माहिती जाहीर करण्यात आलेली नाही. त्यामुळे शिक्षक भरतीची तयारी करणाऱ्या हजारो उमेदवारांची प्रतीक्षा आणखी लांबली आहे.

राज्यातील अनेक सरकारी शाळांमध्ये शिक्षकांची मोठ्या प्रमाणावर रिक्त पदे असल्याची बाब सातत्याने समोर येत आहे. तरीही ही पदे वेळेत भरली जात नसल्याने शिक्षण व्यवस्थेवर त्याचा प्रतिकूल परिणाम होत आहे. शिक्षकांच्या कमतरतेमुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेवर परिणाम होत असून, सरकारी शाळांतील घटती पटसंख्याही चिंतेचा विषय बनली आहे.

नवीन शैक्षणिक वर्षाच्या प्रारंभीच शिक्षकांची रिक्त पदे भरून शैक्षणिक नियोजन सुरळीत करणे अपेक्षित असते. मात्र दरवर्षी भरती प्रक्रियेला होणारा विलंब हीच परिस्थिती यंदाही कायम असल्याचे दिसून येत आहे. सरकारने जाहीर केलेली ९ हजार शिक्षक भरती नेमकी कधी सुरू होणार, याबाबत अद्याप कोणतीही स्पष्टता नसल्याने उमेदवारांमध्ये अस्वस्थता वाढली आहे. त्यामुळे शासनाने विलंब न करता भरतीची अधिसूचना जाहीर करून प्रक्रिया तातडीने सुरू करावी, अशी मागणी शिक्षक भरतीच्या प्रतीक्षेत असलेल्या उमेदवारांकडून होत आहे.

About Belgaum Varta

Check Also

माजी मंत्री बी. सी. नागेश यांचे निधन; ६७व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Spread the love  तुमकूर : माजी शिक्षणमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते बी. सी. नागेश (६७) …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *