Tuesday , August 18 2026
Breaking News

एआयच्या युगात सर्जनशीलता आणि संस्कार जपा; विद्यार्थ्यांना प्रा. शीला घोरपडे यांचे मार्गदर्शन

Spread the love

 

बेळगाव : कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय)च्या वेगाने बदलणाऱ्या युगात तंत्रज्ञानाचा योग्य वापर करताना स्वतःची सर्जनशीलता, कलागुण आणि कौशल्ये जपणे हीच विद्यार्थ्यांची खरी ताकद ठरेल, असे प्रतिपादन आर. एस. महाविद्यालयाच्या भौतिकशास्त्र विभागाच्या प्राध्यापिका प्रा. शीला नितीन घोरपडे (पाटील) यांनी केले.

दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळ संचलित ज्योती पदवीपूर्व महाविद्यालयात जिमखाना तसेच ‘झंकार’ भित्तीपत्रिकेच्या उद्घाटन कार्यक्रमात त्या प्रमुख पाहुण्या म्हणून बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य एस. एस. पाटील होते.

विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना प्रा. घोरपडे म्हणाल्या, “मोबाईल आणि सोशल मीडियाच्या अतिरेकापासून दूर राहून नियमित अभ्यास, दर्जेदार वाचन, सातत्यपूर्ण लेखन, व्यायाम आणि क्रीडा यांना प्राधान्य दिल्यास यशाचा मार्ग निश्चित खुला होतो.” कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर केवळ सोयीचे साधन म्हणून न करता स्वतःच्या विचारशक्तीला आणि सर्जनशीलतेला चालना देण्यासाठी करावा, असेही त्यांनी सांगितले.

महान शास्त्रज्ञ न्यूटन, सी. व्ही. रामन तसेच साहस आणि जिद्दीचे प्रतीक अरुणिमा सिन्हा यांच्या प्रेरणादायी कार्याचा उल्लेख करत त्यांनी विद्यार्थ्यांना चिकाटी, वैज्ञानिक दृष्टिकोन आणि आत्मविश्वासाची जोपासना करण्याचे आवाहन केले. ज्ञानाबरोबरच चारित्र्य, उत्तम आरोग्य आणि निसर्गाशी असलेले नाते जपणेही तितकेच आवश्यक असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.

अध्यक्षीय भाषणात प्राचार्य एस. एस. पाटील यांनी विद्यार्थ्यांनी शैक्षणिक प्रगतीबरोबरच क्रीडा, निबंध, वक्तृत्व, गायन, चित्रकला आणि विविध सांस्कृतिक उपक्रमांत सक्रिय सहभाग घेऊन आपल्या सुप्त गुणांना वाव द्यावा, असे आवाहन केले.

कार्यक्रमाची सुरुवात कुसुम व सहकाऱ्यांनी सादर केलेल्या स्वागतगीताने झाली. प्रमुख पाहुण्यांचा परिचय प्रा. आर. एस. पाटील यांनी करून दिला. सूत्रसंचालन प्रा. हर्षदा पाटील यांनी केले, तर आभार प्रदर्शन प्रा. अतुल नंद्याळकर यांनी मानले. कार्यक्रमास महाविद्यालयातील प्राध्यापक, कर्मचारी तसेच विद्यार्थ्यांची उत्स्फूर्त उपस्थिती होती.

About Belgaum Varta

Check Also

विद्यानगर अनगोळ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाची कार्यकारिणी जाहीर

Spread the love  अमित हलगेकर अध्यक्ष, श्याम गौंडाडकर उपाध्यक्ष; सुवर्ण महोत्सवी वर्षाकडे वाटचाल बेळगाव : …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *