Tuesday , August 25 2026
Breaking News

केसरेकर दाम्पत्य दुहेरी हत्याकांड; आरोपीला कठोर शिक्षा, अनाथ मुलांना शासकीय मदतीची मागणी

Spread the love

 

बेळगाव : सांगली जिल्ह्यातील कुपवाड येथील केसरेकर दाम्पत्य दुहेरी हत्याकांडातील मुख्य आरोपीला कठोरात कठोर शिक्षा देण्यात यावी, तसेच पालक गमावलेल्या दोन्ही मुलांना शासकीय मदत, शिक्षणाची जबाबदारी आणि कायदेशीर संरक्षण मिळावे, अशी मागणी समस्त मराठा समाज बेळगावच्या शिष्टमंडळाने महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्र्यांकडे केली. यासंदर्भात शिष्टमंडळाने मुंबईत उपमुख्यमंत्र्यांची भेट घेऊन मागण्यांचे निवेदन सादर केले.

मूळचे बेळगाव जिल्ह्यातील खानापूर तालुक्यातील हेब्बाळ गावचे रहिवासी असलेले मोहन नागाप्पा केसरेकर (वय ४५) आणि त्यांच्या पत्नी मनीषा मोहन केसरेकर (वय ३५) हे उदरनिर्वाहासाठी सांगली जिल्ह्यातील कुपवाड येथे स्थायिक झाले होते. १५ ऑगस्ट २०२६ रोजी कचरा टाकण्याच्या किरकोळ कारणावरून झालेल्या वादातून शेजारी राहणाऱ्या फरीद शेख याने त्यांच्यावर चाकू आणि हातोड्याने हल्ला केल्याचा आरोप आहे. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या मनीषा आणि मोहन केसरेकर यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यांच्या दोन लहान मुलांवर आई-वडिलांचे छत्र हरपल्याने त्यांच्यासमोर मोठे संकट उभे राहिले आहे.

या पार्श्वभूमीवर शिष्टमंडळाने प्रकरणाचा जलदगतीने आणि निष्पक्ष तपास करून आरोपीवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली. या प्रकरणासाठी विशेष सरकारी वकील नियुक्त करण्यात यावा आणि खटला जलदगती न्यायालयात चालवून कायद्यानुसार आरोपीला कठोरातील कठोर शिक्षा मिळावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली.

तसेच प्रकरणाचा तपास विशेष तपास पथकाकडे (एसआयटी) सोपवून लवकरात लवकर दोषारोपपत्र दाखल करावे, अशीही मागणी करण्यात आली. पालक गमावलेल्या दोन्ही मुलांना राज्य सरकारने आर्थिक मदत द्यावी, त्यांच्या शिक्षणाची तसेच भवितव्याची जबाबदारी स्वीकारावी, अशी विनंती शिष्टमंडळाने केली.

मुख्य फिर्यादी, तिचा भाऊ आणि इतर प्रमुख साक्षीदारांच्या सुरक्षेचा प्रश्न लक्षात घेऊन त्यांना तातडीने पोलीस संरक्षण देण्यात यावे, अशी मागणीही करण्यात आली.

उपमुख्यमंत्र्यांनी निवेदनाची गांभीर्याने दखल घेत पीडित कुटुंबाला लवकर न्याय मिळवून देण्यासाठी आवश्यक कार्यवाही करण्याचे तसेच प्रकरण जलदगती न्यायालयात चालविण्याबाबत सकारात्मक आश्वासन दिल्याचे शिष्टमंडळाने सांगितले.

या वेळी रमाकांत दादा कोंडुसकर, प्राचार्य आनंद आपटेकर, गुणवंत पाटील, सागर पाटील, मोतेश बारदेशकर, नंदू इंदूलकर, गणेश कदम, कपिल भोसले, विनोद बिर्जे, निलेश मुतगेकर आणि विराज मुरकुंबी उपस्थित होते.

केसरेकर कुटुंबीयांच्या पाठीशी समस्त मराठा समाज ठामपणे उभा असून, पीडित मुलांना न्याय, संरक्षण आणि आधार मिळेपर्यंत पाठपुरावा सुरू ठेवण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.

About Belgaum Varta

Check Also

पथविक्रेते आणि महापालिकेत सौहार्द आवश्यक : महापौर प्रीती कामकर

Spread the love  बेळगाव : सार्वजनिक हिताचे रक्षण करताना नियमांचे पालन करणे आवश्यक असल्याने शहरातील …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *