
बेळगाव : जिल्ह्यातील तीन वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या शेळ्या चोरीच्या घटनांचा पोलिसांनी छडा लावत दोघांना अटक केली आहे. आरोपींकडून सुमारे १.५० लाख रुपयांहून अधिक किमतीच्या सात शेळ्या जप्त करण्यात आल्या आहेत. तसेच चोरीसाठी वापरण्यात आलेली कार आणि दुचाकीही पोलिसांनी ताब्यात घेतली आहे.
अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे लक्ष्मण कणबर्गी (३०, रा. अंकलगी, ता. गोकाक) आणि सिद्धप्पा नायक (२७, रा. बन्नीबागी, ता. हुक्केरी) अशी आहेत. त्यांच्या ताब्यातून मारुती सुझुकी ८०० कार तसेच दिवसा चोरीसाठी परिसराची पाहणी करण्यासाठी वापरण्यात येणारी दुचाकी जप्त करण्यात आली.
यमकनमर्डी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील होसूर, हुक्केरी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील अर्जुनवाडा आणि अंकलगी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील कुंदरगी येथे शेळ्या चोरीच्या घटना घडल्या होत्या.
या घटनांचा तपास सुरू असताना पोलिसांना एका संशयास्पद वाहनाची माहिती मिळाली. वाहन तपासणीदरम्यान पोलिसांनी कार थांबवून चौकशी केली. चौकशीत दोन्ही आरोपींचा शेळ्या चोरीच्या घटनांशी संबंध असल्याचे समोर आले. त्यानंतर केलेल्या अधिक चौकशीत तीन वेगवेगळ्या पोलिस ठाण्यांच्या हद्दीत झालेल्या चोरीच्या घटनांचा उलगडा झाला.
यमकनमर्डी पोलिस निरीक्षक जावेद मुशापुरी यांच्या नेतृत्वाखाली बी. के. पाटील आणि त्यांच्या पथकाने ही कारवाई केली. याप्रकरणी यमकनमर्डी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे.

Belgaum Varta Belgaum Varta