
बेळगाव : श्री राम कॉलनी आदर्श रहिवासी संघटनेचा सहावा वर्धापनदिन विविध सामाजिक, सांस्कृतिक आणि समाजोपयोगी उपक्रमांनी उत्साहात साजरा करण्यात आला. २३ सप्टेंबर रोजी सायंकाळी गंगा नारायण सभागृहात आयोजित कार्यक्रमाला रहिवाशांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
कार्यक्रमाच्या प्रारंभी संघटनेचे अध्यक्ष बाबुराव घोरपडे, माजी महापौर मंगेश पवार, कार्याध्यक्ष डॉ. मुरुगेन्द पटृनशेटी, सेक्रेटरी सुधीर सांबरेकर, माजी अध्यक्ष विलास घाडी आणि खजिनदार राजाराम गुरव यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. तसेच श्री विठ्ठल-रखुमाईच्या मूर्तीला पुष्पहार अर्पण करून पूजा करण्यात आली.

यावेळी वडगाव येथील मरगाई भजनी मंडळाचे संचालक शंकर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली भजनांचा कार्यक्रम झाला. सुमारे दोन तास चाललेल्या या भक्तिमय कार्यक्रमाचा उपस्थितांनी मनमुराद आनंद घेतला. सौ. शुभांगी कारेकर यांनी सादर केलेल्या अभंगांनी उपस्थितांना मंत्रमुग्ध केले.
माजी शिक्षण अधिकारी चांगदेव कंग्राळकर यांनी प्रास्ताविकातून संघटनेच्या आगामी उपक्रमांची माहिती दिली. परिसरात श्री स्वामी समर्थ मंदिर उभारण्याचा संकल्प असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी दिशा दर्शक फलकाचे उद्घाटन करण्यात आले. २०२५-२६ या शैक्षणिक वर्षात चांगले गुण मिळवून उत्तीर्ण झालेल्या पाच विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र व बक्षीस देऊन गौरविण्यात आले. तसेच नुकत्याच सेवानिवृत्त झालेल्या शिक्षिका सौ. सुनिता प्रकाश घाडी यांचा विशेष सत्कार करण्यात आला. स्वच्छता अभियानासह विविध समाजोपयोगी उपक्रमही राबविण्यात आले.
माजी सेक्रेटरी प्रदीप चव्हाण यांनी संघटनेच्या कार्याचा आढावा घेतला. विविध भागांतून आलेल्या रहिवाशांनी हिंदू धर्मातील सर्व सण एकत्रितपणे साजरे करण्याचे आवाहन केले. नेत्रदान, अवयवदान आणि देहदानाचे महत्त्व यावेळी अधोरेखित करण्यात आले. वैद्यकीय शिक्षणासाठी मानवी देहाची आवश्यकता असल्याने देहदानासाठी समाजातील विविध संघटनांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन करण्यात आले. महिला मंडळानेही विविध सामाजिक व समाजोपयोगी उपक्रम राबवावेत, असे सुचविण्यात आले.
अध्यक्ष बाबुराव घोरपडे यांनी संघटनेच्या माध्यमातून डॉ. मुरुगेन्द पटृनशेटी यांच्या मार्गदर्शनाखाली दररोज सकाळी दीड तास योगवर्ग सुरू असल्याचे सांगितले. अधिकाधिक सदस्यांनी त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले. महिलांनी घरातील जबाबदाऱ्यांसोबत स्वतःच्या आरोग्याचीही काळजी घ्यावी. मुलांनी मोबाईलपासून दूर राहून नियमित व्यायाम व अभ्यास करून विविध क्षेत्रांत यश संपादन करावे, असेही त्यांनी सांगितले.
प्रमुख पाहुणे सुप्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक अनंत पाटील यांनी संघटनेच्या कार्याचे कौतुक करून समाजोपयोगी उपक्रमांना सदैव सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. त्यांनी शंकर पाटील व मरगाई भजनी मंडळाचेही कौतुक केले.
यावेळी अनंत पाटील, शंकर पाटील, तबलावादक तसेच भजनी मंडळातील प्रमुखांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन अध्यक्ष बाबुराव घोरपडे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. देणगीदार राघवेंद्र रायकर यांचा डॉ. मुरुगेन्द पटृनशेटी, बाबुराव घोरपडे, विलास घाडी, सुधीर सांबरेकर आणि राजाराम गुरव यांच्या हस्ते सत्कार झाला. श्रीमती भस्मे यांचा उपाध्यक्ष वर्षा घाडी व सौ. अनिता चव्हाण यांच्या हस्ते गौरव करण्यात आला.
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना तब्बल ३५ वर्षे घडविण्याचे मोलाचे कार्य करून नुकत्याच सेवानिवृत्त झालेल्या शिक्षिका सौ. सुनिता प्रकाश घाडी यांचा महिला मंडळाच्या कार्याध्यक्षा सौ. गीता गुरव, सेक्रेटरी सौ. शीतल घोरपडे व सौ. नंदिनी चौगुले यांच्या हस्ते शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. सौ. शुभांगी कारेकर यांचा महिला मंडळाच्या अध्यक्षा स्नेहा जोशी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्याध्यक्ष डॉ. मुरुगेन्द पटृनशेटी आणि माजी अध्यक्ष विलास घाडी यांचाही संघटनेतर्फे गौरव करण्यात आला.
कार्यक्रमाचे उत्कृष्ट सूत्रसंचालन जयवंत खन्नूकर यांनी केले, तर आभार प्रदर्शन प्रदीप जोशी यांनी केले. दरवर्षीप्रमाणे संघटनेचे सदस्य सोमेश्वर मुस्तीगिरी व परिवारातर्फे महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.

Belgaum Varta Belgaum Varta