
बेळगाव : मराठा को-ऑपरेटिव्ह बँकेने आर्थिक वर्ष २०२५-२६ मध्ये उल्लेखनीय आर्थिक कामगिरी करत २ कोटी ८८ लाख रुपयांचा निव्वळ नफा मिळविला आहे. बँकेचे चेअरमन बाळाराम पाटील व संचालक मंडळाने ही माहिती दिली.
बँकेची ८४ वी वार्षिक सर्वसाधारण सभा रविवार, दि. ३० ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ११ वाजता बेळगाव येथील मराठा मंदिर, खानापूर रोडवरील ‘अर्जुनराव गोविंदराव घोरपडे’ सभागृहात आयोजित करण्यात आली आहे. या सभेत आर्थिक वर्ष २०२५-२६ मधील बँकेच्या आर्थिक व्यवहारांचा तसेच विविध नवीन उपक्रमांचा आढावा घेण्यात येणार आहे.
दि. ३१ मार्च २०२६ अखेर बँकेच्या सभासदांची संख्या १३,६४६ झाली असून, शेअर भांडवल २ कोटी ९२ लाख ७६ हजार ५०० रुपये आहे. बँकेच्या एकूण ठेवी ३४१ कोटी ४० लाख ३६ हजार रुपये, तर कर्ज वितरण २४३ कोटी ३७ लाख ३ हजार रुपये इतके झाले आहे. बँकेची गुंतवणूक १६७ कोटी ५५ लाख रुपयांवर पोहोचली आहे.
सभासदांच्या ठेवी सुरक्षित राहाव्यात यासाठी बँकेने ५ लाख रुपयांपर्यंत ठेवींचा विमा उपलब्ध करून दिला आहे. ज्येष्ठ नागरिकांना ठेवींवर अर्धा टक्का अतिरिक्त व्याजदर दिला जात असून, एक वर्षाच्या ठेवींवर ८ टक्के व्याजदर देण्यात येत आहे.
कर्ज व्यवहार वाढविण्यासाठी बँकेने विविध कर्जांचे व्याजदर समतोल ठेवले आहेत. गृहकर्जाचा EMI व्याजदर १० टक्के, कार कर्ज १० टक्के, तर सामान्य कर्जाचा व्याजदर ११.५० टक्के आहे. बँकेचा Gross NPA १.९६ टक्के, तर Net NPA शून्य टक्के आहे.
सरकारी लेखापरीक्षणात बँकेला ‘अ’ (A) वर्ग प्राप्त झाला आहे. सामाजिक बांधिलकी जपत आर्थिकदृष्ट्या अग्रक्रम क्षेत्रासाठी ८३.६२ टक्के, तर दुर्बल घटकांसाठी ५६.१९ टक्के कर्जवाटप करण्यात आले आहे.
दरम्यान, रिझर्व्ह बँकेच्या निकषांनुसार कॅपिटल अॅडिक्वसी रेशो (CRAR) किमान १२ टक्के असणे आवश्यक असताना मराठा को-ऑपरेटिव्ह बँकेचा CRAR २०.६४ टक्के आहे. बँकेची सक्षम आर्थिक स्थिती, सदृढता आणि आर्थिक स्थैर्य दर्शविणारा हा महत्त्वाचा निर्देशांक असल्याचे बँकेच्या संचालक मंडळाने नमूद केले.

Belgaum Varta Belgaum Varta