
गोवा : गोव्यातील प्रसिद्ध कॅसिनो ‘प्राइड’ आणि ‘मॅजेस्टिक’चे संचालक श्रीनिवास नायक यांच्यावर मध्यरात्री अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केल्याची धक्कादायक घटना घडली. सुदैवाने या हल्ल्यात नायक तसेच त्यांचे सुरक्षा कर्मचारी बचावले असून, कोणालाही गोळी लागलेली नाही.
श्रीनिवास नायक हे मूळचे उत्तर कन्नड जिल्ह्यातील यल्लापूर तालुक्यातील रहिवासी आहेत. गोव्यातील पणजीजवळील पर्वरी येथील मॅजेस्टिक हॉटेल परिसरात ही घटना घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, दोन हल्लेखोर नायक यांच्या येण्याची वाट पाहत दबा धरून बसले होते. नायक हॉटेलमधून बाहेर पडताच हल्लेखोरांनी त्यांच्यावर अचानक गोळीबार केला. मात्र, नायक आणि त्यांच्या सुरक्षा रक्षकांनी प्रसंगावधान राखल्याने ते थोडक्यात बचावले.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तसेच अन्य पुराव्यांच्या आधारे हल्लेखोरांचा शोध सुरू करण्यात आला आहे. गोळीबारामागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून, पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.
या घटनेमुळे गोवा आणि उत्तर कन्नड परिसरात खळबळ उडाली आहे.

Belgaum Varta Belgaum Varta