
बेळगाव : “भगवान श्रीकृष्ण यांची अनेक विस्तारित रूपे आहेत त्यामध्ये भगवान बलराम हे भगवान श्रीकृष्णांचे पहिले विस्तारित रूप आहे. म्हणूनच भगवान बलराम यांचा जन्म श्रीकृष्णांच्या अगोदर रोहिणी मातेच्या गर्भातून झाला” असे विचार इस्कॉन बेळगावचे अध्यक्ष परमपूज्य भक्तीरसामृत स्वामी महाराज यांनी बोलताना व्यक्त केले.
भगवान बलराम यांचा प्राकट्य दिवस हा इस्कॉन चळवळीमध्ये बलराम जयंती म्हणून साजरा केला जातो. यंदा हा दिवस शुक्रवारी इस्कॉनच्या श्री श्री राधा गोकुळानंद मंदिरात उत्साहाने साजरा करण्यात आला. त्यानिमित विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
यानिमित्त मंदिरात सुंदर अशी फुलांची सजावट करण्यात आली असून सायंकाळी सहा वाजता अभिषेक संपन्न झाल्यावर परमपूज्य भक्ती रसामृत स्वामी महाराज यांचे प्रवचन झाले.
आपल्या प्रवचनात भगवान बलराम यांच्या जीवनाचा इतिहास त्यांनी कथन केला.
श्रीमद् भागवतातील दहाव्या स्कंदातील दुसऱ्या अध्यायात श्लोक आठ चे वर्णन त्यांनी केले.
“भगवान श्रीकृष्ण हे आपली अंतरिक शक्ती असलेल्या योगमायाला आदेश देतात की मथुरेत वास्तव्यास असलेल्या देवकीच्या गर्भात माझा अंश आहे तो रोहिणीच्या गर्भात स्थलांतरित करा. खरे पाहता रोहिणी माता याही वसुदेवाबरोबरच मथुरेमध्ये राहत होत्या. त्या ज्यावेळी मथुरेहून गोकुळाला गेल्या त्या वेळेला त्या तीन महिन्याच्या गरोदर होत्या. त्यामुळे साधारण 14 महिन्यानंतर रोहिणी मातेच्या गर्भातून बलरामजींचा जन्म झाला” असे सांगून भगवान कोण आहेत हे समजण्यासाठी श्रीमद् भागवत वाचण्याची गरज असल्याचे प्रतिपादन महाराजांनी केले.
“भगवान श्रीकृष्णांची श्रीराम, बलराम, वराह अशी अनेक विस्तारित रूपे असली तरीही भगवान श्रीकृष्ण हे च सर्वांचे स्त्रोत्र आहेत’ असाही खुलासा महाराजांनी केला.
प्रवचनानंतर भजन, कीर्तन आणि सर्वांसाठी महाप्रसाद झाला. मंदिरात भाविकांनी प्रचंड गर्दी केली होती.
रोज श्रीकृष्ण कथाकथन
श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या निमित्ताने मंदिरात शनिवारपासून चार सप्टेंबर पर्यंत रोज सायंकाळी सहा वाजता परमपूज्य भक्तीरसामृत स्वामी महाराजांचे श्रीकृष्ण कथाकथन होणार आहे त्याचा भक्तांनी लाभ घ्यावा असे आवाहन इस्कॉनतर्फे करण्यात आले आहे. आणि रात्री साडेआठ नंतर महाआरती व सर्वांसाठी प्रसाद आयोजित केला आहे. भक्तांनी उपस्थित राहून याचा लाभ घ्यावा असे आवाहन इस्कॉनतर्फे करण्यात आले आहे.

Belgaum Varta Belgaum Varta