Friday , August 28 2026
Breaking News

पोस्को प्रकरणातील तरुणाला अखेर नियमित जामीन; ३ महिने २६ दिवसांनंतर न्यायालयाचा दिलासा

Spread the love

 

बेळगाव : खानापूर तालुक्यातील चर्चेत असलेल्या पोस्को प्रकरणात गेल्या सुमारे तीन महिने २६ दिवसांपासून न्यायालयीन कोठडीत असलेल्या तरुणाला अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा विशेष पोस्को न्यायालयाने नियमित जामीन मंजूर केला आहे. याबाबतचा आदेश न्यायालयाने २७ ऑगस्ट २०२६ रोजी दिला.

प्रकरणातील माहितीनुसार, संबंधित तरुण व अल्पवयीन मुलगी यांच्यात प्रेमसंबंध असल्याचे समोर आले होते. त्यानंतर दोघेही घरातून बाहेर पडले होते. सुमारे २० दिवसांच्या कालावधीत त्यांनी बेळगाव, पंढरपूर, कोल्हापूर आणि पुणे आदी ठिकाणी वास्तव्य केल्याचे तपासात नमूद करण्यात आले आहे.

त्यानंतर दोघेही घरी परतले. मुलगी अल्पवयीन असल्याने तिच्या पालकांनी खानापूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार गुन्हा क्रमांक ११२/२०२६ नोंद करण्यात आला. पुढे या प्रकरणाची विशेष पोस्को प्रकरण क्रमांक ४१५/२०२६ अशी नोंद झाली.

या प्रकरणात भारतीय न्याय संहिता, २०२३ मधील संबंधित कलमांसह पोस्को कायदा, २०१२ अंतर्गत कलम ४ व ६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आरोपी तरुण तीन महिन्यांहून अधिक काळ न्यायालयीन कोठडीत असल्याने त्याच्याकडून नियमित जामिनासाठी विशेष पोस्को न्यायालयात अर्ज करण्यात आला होता. आरोपीच्या वतीने ॲड. सिद्धार्थराजे सावंत यांनी युक्तिवाद केला. यावेळी प्रकरणाची पार्श्वभूमी, दोघांमधील संबंध, त्यांनी एकत्र घालवलेला कालावधी तसेच तपासातील अन्य बाबी न्यायालयाच्या निदर्शनास आणून देण्यात आल्या.

उपलब्ध कागदपत्रे आणि दोन्ही बाजूंचे युक्तिवाद विचारात घेतल्यानंतर न्यायालयाने आरोपीला नियमित जामीन मंजूर केला.

दरम्यान, या प्रकरणातील आरोपांवर अद्याप अंतिम सुनावणी झालेली नाही. त्यामुळे जामीन मंजूर होणे म्हणजे आरोप सिद्ध किंवा आरोपी निर्दोष ठरल्याचे मानले जात नाही. प्रकरणाचा अंतिम निर्णय पुढील न्यायालयीन कार्यवाहीअंती होणार आहे.

About Belgaum Varta

Check Also

मराठा रेजिमेंटमध्ये रंगला रक्षाबंधनाचा स्नेहसोहळा

Spread the love  बेळगाव : बेळगाव येथील मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटल सेंटर (मराठा एलआयआरसी) येथे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *