
बेळगाव : मराठा युवक संघ आणि आबा हिंद स्पोर्ट्स क्लबच्या सहकार्याने आयोजित करण्यात आलेल्या २१व्या भव्य आंतरशालेय तसेच आंतरमहाविद्यालयीन आंतरराज्य जलतरण स्पर्धांना आज, शनिवार दि. २९ ऑगस्टपासून सुरुवात होत आहे. महानगरपालिकेच्या गोवावेस येथील जलतरण तलावात दुपारी २ वाजल्यापासून स्पर्धा होणार आहेत. स्पर्धेचे अधिकृत उद्घाटन सायंकाळी ४ वाजता मान्यवरांच्या हस्ते होणार आहे.
या स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. रवी पाटील, उद्योजक महादेव चौगुले, नगरसेवक नितीन जाधव, आबा स्पोर्ट्स क्लबचे अध्यक्ष शीतल हुलभते, हिंद सोशल स्पोर्ट्स क्लबचे अध्यक्ष अरविंद संगोळी, चार्टर्ड अकाउंटंट राजू मुंदडा उपस्थित राहणार आहेत.
तसेच मराठा युवक संघाचे अध्यक्ष बाळासाहेब काकतकर, सचिव चंद्रकांत गुंडकल, कार्याध्यक्ष रघुनाथ बांडगी, उपाध्यक्ष मारुती देवगेकर, सुहास किल्लेकर आणि जलतरण प्रशिक्षक विश्वास पवार यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
ज्युनिअर केजीपासून महाविद्यालयीन गटापर्यंत विविध वयोगटांत या स्पर्धा घेण्यात येणार आहेत. कर्नाटक, महाराष्ट्र आणि गोवा या तीन राज्यांमधून ३०० हून अधिक जलतरणपटू स्पर्धेत सहभागी होणार आहेत. त्यामुळे यंदाच्या स्पर्धेला मोठा प्रतिसाद मिळण्याची अपेक्षा आहे.
स्पर्धेत सहभागी होणाऱ्या सर्व जलतरणपटूंनी दुपारी २ वाजता गोवावेस जलतरण तलाव येथे उपस्थित राहावे, असे आवाहन मराठा युवक संघाचे सचिव चंद्रकांत गुंडकल यांनी केले आहे.

Belgaum Varta Belgaum Varta