


भालकी-बिदर दौऱ्यावरून बेळगावला परतताना सोलापुरात कट्टर शिवसैनिक अतुल भवर यांची घेतली सदिच्छा भेट
सोलापूर : भालकी-बिदर दौरा आटोपून बेळगावकडे परतत असताना सोलापूर येथे कट्टर शिवसैनिक, खासदार संजय राऊत यांचे विश्वासू सहकारी अतुलजी भवर यांची महाराष्ट्र एकीकरण युवा समिती सीमाभागचे अध्यक्ष शुभम शेळके यांनी सदिच्छा भेट घेतली. यावेळी अतुल भवर यांनी आपुलकीने स्वागत करून सन्मान केला. या भेटीत सीमालढा, सीमावासीयांचे प्रश्न आणि भविष्यात महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नी अधिक प्रभावीपणे काम करण्याबाबत सविस्तर चर्चा झाली.
संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्याचा इतिहास हा शिवसेना आणि सीमालढ्याच्या संघर्षाशी जोडलेला आहे. प्रबोधनकार ठाकरे, हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्यापासून ते आज उद्धवसाहेब ठाकरे यांच्यापर्यंत ठाकरे कुटुंबाने सीमावासीयांच्या प्रश्नाला सातत्याने पाठिंबा दिला आहे. संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात शिवसेनेनेही हुतात्मे दिले असून, सीमाभागातील मराठी माणसाच्या हक्कासाठी शिवसैनिक आजही ठामपणे आवाज उठवत आहेत.
बेळगावात मराठी माणसावर अन्याय झाला की कोल्हापूरकर ज्या तत्परतेने सीमाबांधवांच्या मदतीला धावून येतात, त्याच भावनेने सोलापूरही सीमाभागाच्या लढ्याशी जोडलेले आहे. महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवरील महत्त्वाचे शहर म्हणून सोलापूरची सीमाप्रश्नाशी असलेली नाळ कायमच घट्ट राहिली आहे.
सोलापूरमधून अतुल भवर यांनी अनेकदा सीमावासीयांच्या प्रश्नांना समाजमाध्यमांच्या माध्यमातून आवाज दिला आहे. २०२१ च्या बेळगाव लोकसभा पोटनिवडणुकीतही त्यांनी सीमावासीयांच्या बाजूने ठाम भूमिका घेत समाजमाध्यमांवरून प्रचार केला होता. सीमाभागातील मराठी जनतेच्या हक्कांसाठी भविष्यातही आवश्यक ती सर्व मदत करण्याचे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.
या भेटीतून शिवसेना आणि महाराष्ट्र एकीकरण समिती सीमालढ्यासाठी एका नाण्याच्या दोन बाजू असल्याप्रमाणे कार्यरत आहेत, ही भावना पुन्हा एकदा अधोरेखित झाली. सीमालढा हा केवळ सीमाभागापुरता मर्यादित नसून संपूर्ण महाराष्ट्राच्या अस्मितेचा आणि मराठी जनतेच्या हक्काचा प्रश्न आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील प्रत्येक घटकाने सीमाबांधवांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याची गरज असल्याचे यावेळी व्यक्त करण्यात आले.
सीमालढा सुरू आहे, सुरूच राहील; आणि महाराष्ट्राच्या या न्याय्य लढ्याला महाराष्ट्राची ताकद मिळत राहील, असा निर्धार या भेटीतून व्यक्त झाला.
यावेळी सरचिटणीस मनोहर हुंदरे, अशोक घगवे, सचिन दळवी, रंजित हावळण्णाचे, रमेश माळवी, शिवसेना युवासेना चे प्रमुख विनायक हुलजी, श्रीकांत नांदुरकर, वकील वैभव कुट्रे तसेच हरीबसू धुळजी, विनायक पवार, राजू पाटील, निलेश काकतकर, सुरज जाधव, उमेश पाटील, परीणय कदम विद्येश बडस्कर, ओमकार बैलुरकर, ज्ञानेश चिकुर्डे, गोविद कुडेंकर, यल्लाप्पा पाटील, चेतन खोटे, अमोल चौगुल, विनायक कांगले, यश कदम, प्रणव घगवे आदी उपस्थित होते.

Belgaum Varta Belgaum Varta