
प्रवाशांना दिलासा, १६ व १७ ऑक्टोबरला धावणार
बेळगाव : दसरा सण आणि सप्ताह अखेरच्या सुट्ट्यांमुळे रेल्वे प्रवाशांची वाढणारी गर्दी लक्षात घेऊन नैऋत्य रेल्वेने बेंगळूर–बेळगावदरम्यान विशेष एक्सप्रेस सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. १६ आणि १७ ऑक्टोबर रोजी धावणाऱ्या या विशेष गाडीमुळे प्रवाशांची गर्दी विभागण्यास मदत होणार असून, सणासुदीच्या काळात प्रवासाची सोय उपलब्ध होणार आहे.
बेंगळूर–बेळगाव विशेष एक्सप्रेस १६ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ७ वाजता बेंगळूरहून सुटून दुसऱ्या दिवशी सकाळी ८.३० वाजता बेळगावला पोहोचेल. परतीच्या प्रवासात बेळगाव–बेंगळूर विशेष एक्सप्रेस १७ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ५.३० वाजता बेळगावहून रवाना होईल. ही गाडी दुसऱ्या दिवशी पहाटे ५ वाजता बेंगळूरला पोहोचणार आहे.
या गाडीला दोन्ही दिशांनी तुमकूर, आरसीकेरे, बिरूर, दावणगिरी, हरिहर, हावेरी, हुबळी, धारवाड, आळणावर, लोंढा आणि खानापूर येथे थांबे देण्यात आले आहेत. एकूण १८ डब्यांसह ही विशेष एक्सप्रेस धावणार आहे.
दसरा आणि सप्ताह अखेरच्या काळात प्रवाशांची होणारी गैरसोय टाळण्यासाठी विशेष रेल्वेची व्यवस्था करण्यात आल्याची माहिती नैऋत्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी डॉ. मंजुनाथ कलमाडी यांनी दिली.

Belgaum Varta Belgaum Varta

