


निर्मला सीतारामन यांच्या नावाने यूट्यूबवर जाहिरात; हिंदवाडीतील ६० वर्षीय व्यक्तीची सायबर फसवणूक
बेळगाव : शेअर बाजारात पैसे गुंतवल्यास मोठा नफा मिळेल, असे आमिष दाखवून सायबर गुन्हेगारांनी हिंदवाडी येथील एका वृद्धाला तब्बल २१ लाख ९३ हजार ९९९ रुपयांचा गंडा घातला आहे. किशोर कर्नाटकी (वय ६०) यांनी याप्रकरणी गुरुवार, दि. ८ रोजी शहर सीईएन पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.
फिर्यादी कर्नाटकी यांच्या मोबाईलवर २० जून रोजी यूट्यूबवर शेअर बाजारात गुंतवणूक केल्यास नफा मिळू शकतो, अशी जाहिरात आली होती. ही जाहिरात केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या नावाने प्रसारित करण्यात आली होती. जाहिरातीखाली दिलेल्या लिंकवर क्लिक केल्यानंतर नाव व पत्ता नोंदवून नोंदणी करण्यास सांगण्यात आले. त्यानंतर वेगवेगळ्या इन्स्टाग्राम खात्यांवरून तसेच मोबाईल क्रमांकांवरून त्यांच्याशी संपर्क साधण्यात आला.
सुरुवातीला २२ हजार रुपये फोन-पेद्वारे पाठविण्यास सांगण्यात आले. त्यानुसार कर्नाटकी यांनी बँक ऑफ इंडियाच्या खात्याशी संलग्न मोबाईल क्रमांकावरून ‘प्राइम ट्रेड एफएक्स’च्या माध्यमातून पैसे पाठविले. त्यानंतर अधिक पैसे गुंतवल्यास जास्त नफा मिळेल, असे आमिष दाखविण्यात आले. या आश्वासनाला बळी पडून त्यांनी दोन वेगवेगळ्या बँक खात्यांतून टप्प्याटप्प्याने मोठी रक्कम पाठविली.
मात्र, पैसे गुंतवूनही अपेक्षित परतावा न मिळाल्याने आपली फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यानंतर त्यांनी पोलिसांत धाव घेत तक्रार दाखल केली. या प्रकरणाचा पुढील तपास शहर सीईएन पोलीस करीत आहेत.
अनधिकृत गुंतवणूक जाहिरातींपासून सावध राहा!
सोशल मीडियावरील मोठ्या नफ्याच्या आमिषाला बळी पडू नका. कोणत्याही व्यक्तीच्या किंवा प्रसिद्ध नेत्याच्या नावाने आलेल्या जाहिरातीची सत्यता तपासल्याशिवाय पैसे गुंतवू नयेत, असे आवाहन करण्यात येत आहे.

Belgaum Varta Belgaum Varta