Friday , October 23 2026
Breaking News

ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी खुशखबर! केपीएसच्या विद्यार्थ्यांना मोफत स्कूल बस

Spread the love

 

बेळगाव : खासगी शाळांच्या धर्तीवर सरकारी शाळांमध्येही सुविधा उपलब्ध करून देण्याच्या दिशेने शिक्षण खात्याने पुढाकार घेतला आहे. पुढील शैक्षणिक वर्षापासून राज्यातील कर्नाटक पब्लिक स्कूल (केपीएस) मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना मोफत स्कूल बस सेवा उपलब्ध करून देण्याची योजना आखण्यात येत आहे. या योजनेमुळे विशेषतः ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचा शाळेपर्यंतचा प्रवास सुलभ होण्याबरोबरच पालकांवरील आर्थिक भारही कमी होण्याची अपेक्षा आहे.

ग्रामीण भागातील अनेक विद्यार्थ्यांना शाळेत पोहोचण्यासाठी लांबचे अंतर पायी पार करावे लागते. काही गावांमध्ये सार्वजनिक वाहतुकीची पुरेशी सुविधा नसल्याने विद्यार्थ्यांची गैरसोय होते. तर, दररोजच्या प्रवासाचा खर्च परवडत नसल्याने पालकांनाही आर्थिक अडचणींचा सामना करावा लागतो. या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांना सुरक्षित आणि विनाखर्च प्रवासाची सुविधा उपलब्ध करून देण्याचा शिक्षण खात्याचा प्रयत्न आहे.

योजनेच्या अंमलबजावणीसाठी स्कूल बस खरेदी करण्याची तयारी सुरू आहे. प्रत्येक केपीएसमधील विद्यार्थिसंख्या, बसची गरज आणि संबंधित परिसरातील वाहतुकीची स्थिती यांचा विचार करून नियोजन केले जाणार आहे. त्यासाठी आवश्यक निधी आणि बससेवेच्या व्यवस्थापनाबाबतही कार्यवाही करण्यात येणार आहे.

शिक्षणमंत्री मधु बंगारप्पा यांनी स्पष्ट केल्यानुसार, वाहतुकीच्या सुविधेअभावी कोणत्याही विद्यार्थ्याचे शिक्षण थांबू नये, हा या उपक्रमामागील प्रमुख उद्देश आहे.

ग्रामीण शिक्षणाला मिळणार बळ

योजनेची प्रभावी अंमलबजावणी झाल्यास दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना शाळेत ये-जा करणे सोयीचे होईल. विद्यार्थ्यांची उपस्थिती वाढविणे, पालकांचा प्रवासखर्च कमी करणे आणि सरकारी शाळांकडे विद्यार्थ्यांचा ओढा वाढविणे यासाठीही ही योजना उपयुक्त ठरू शकते. मात्र, योजनेचा प्रत्यक्ष लाभ किती विद्यार्थ्यांना मिळणार आणि बससेवा कोणत्या निकषांनुसार उपलब्ध होणार, हे अंमलबजावणीच्या नियोजनानंतर स्पष्ट होणार आहे.

About Belgaum Varta

Check Also

गृहज्योती योजनेतून १.३ लाख ग्राहक बाहेर; वैयक्तिक कागदपत्रे देण्यास नकार

Spread the love  बेळगाव : कर्नाटक सरकारच्या महत्त्वाकांक्षी गृहज्योती योजनेला मोठा धक्का बसला असून, सुमारे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *