बेळगाव (वार्ता) : भाजपा ओबीसी मोर्चाचे राज्य सचिव किरण जाधव यांनी राज्य रेल्वेमंत्री रावसाहेब दानवे यांची भेट घेऊन विविध विषयांवर चर्चा केली.
केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री आणि बेळगावचे खासदार सुरेश अंगडी यांच्या अखत्यारित येणाऱ्या विकासकामांना त्यांच्या निधनानंतर खीळ बसली आहे, याकडे किरण जाधव यांनी मंत्री दानवे यांचे लक्ष वेधून घेतले.
बेळगाव रेल्वे स्थानकाच्या नूतनीकरण आणि सुशोभीकरण कामाला सुरेश अंगडी यांच्या कारकिर्दीत चालना मिळाली होती. मात्र ते कामही आता रोडावले आहे. टिळकवाडी येथील तिसऱ्या रेल्वे फाटकानजीकच्या उड्डाणपुलाचे कामही धीम्या गतीने सुरू आहे. याशिवाय सुरेश अंगडी यांनी चालना दिलेली इतर विकासकामेही संथ गतीने सुरू आहेत. याबद्दलची वस्तूस्थिती किरण जाधव यांनी रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्यासमोर मांडली.
श्री. दानवे यांनी बेळगावला भेट देऊन केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांच्या कार्य कालावधीत चालना देण्यात आलेल्या आणि त्यांच्या निधनानंतर धीम्या गतीने सुरू असलेल्या विकास कामांची पाहणी करून सदर विकास कामे युद्धपातळीवर राबवावीत अशी मागणी किरण जाधव यांनी रावसाहेब दानवे यांच्याकडे केली. किरण जाधव यांच्या विनंतीनुसार, लवकरच बेळगावला भेट देऊन विकास कामांची पाहणी केली जाईल आणि ही विकास कामे शक्य तितक्या लवकर मार्गी लावण्यासाठी प्रयत्न केले जातील अशी ग्वाही रेल्वे राज्य मंत्री दानवे यांनी किरण जाधव यांना दिली.