


राजू शेट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली हजारो शेतकरी रस्त्यावर; योग्य दर मिळेपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्धार
कोगनोळी : ऊसाला योग्य आणि वाढीव दर मिळावा, या मागणीसाठी महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवरील कोगनोळी टोलनाक्यावर हजारो ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी तीव्र रस्ता रोको आंदोलन सुरू केले आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक आणि माजी खासदार राजू शेट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या या आंदोलनामुळे पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील वाहतुकीवर मोठा परिणाम झाला आहे.
या आंदोलनात निपाणी, कोल्हापूर, जयसिंगपूर, कागल आणि सीमाभागातील हजारो शेतकरी सहभागी झाले आहेत. कोणत्याही राजकीय पक्षाचा झेंडा न घेता, केवळ शेतकरी हितासाठी एकत्र आलेल्या आंदोलकांनी बैलगाड्या, ट्रॅक्टर आणि अन्य वाहनांसह टोलनाक्यावर ठिय्या दिला आहे. मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन मागे न घेण्याचा निर्धार शेतकऱ्यांनी व्यक्त केला आहे.
लेखी आश्वासन मिळेपर्यंत माघार नाही!
आंदोलनस्थळी शेतकऱ्यांना संबोधित करताना राजू शेट्टी यांनी ऊसाला रास्त दर देण्याची मागणी केली. शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती लक्षात घेऊन सरकारने तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा. ठोस निर्णय आणि लेखी आश्वासन मिळाल्याशिवाय आंदोलन स्थगित केले जाणार नाही, असा ठाम इशाराही त्यांनी दिला.
महामार्गावर ठिय्या; वाहतूक पर्यायी मार्गाने
शेतकऱ्यांनी महामार्गावरच ठाण मांडल्याने प्रशासनाची धावपळ उडाली आहे. वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी पोलिसांनी पुण्याकडून बंगळूरकडे जाणारी तसेच बंगळूरकडून महाराष्ट्राच्या दिशेने येणारी वाहतूक पर्यायी मार्गाने वळवली आहे. संभाव्य अनुचित प्रकार टाळण्यासाठी सीमाभागात महाराष्ट्र आणि कर्नाटक पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
ऊस दराच्या प्रश्नावर सरकार काय भूमिका घेते आणि चर्चेतून तोडगा कधी निघतो, याकडे शेतकरी तसेच सीमाभागातील नागरिकांचे लक्ष लागले आहे. मागण्यांवर समाधानकारक निर्णय होईपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याच्या भूमिकेवर शेतकरी ठाम आहेत.

Belgaum Varta Belgaum Varta