Friday , October 23 2026
Breaking News

टनाला ५,५०० रुपये दरासाठी शेतकऱ्यांचा एल्गार! महामार्गांवर रात्रभर ठिय्या; राज्यभर वाहतूक विस्कळीत

Spread the love

 

 

बेळगाव, हावेरी, धारवाड, कलबुर्गीत आंदोलन तीव्र; मागण्या मान्य न झाल्यास राज्यव्यापी बंदचा इशारा

बेळगाव : उसाला प्रतिटन किमान ५,५०० रुपये दर मिळावा, या प्रमुख मागणीसाठी कर्नाटकातील शेतकऱ्यांनी केंद्र व राज्य सरकारांविरोधातील आंदोलन तीव्र केले आहे. बेळगाव, हावेरी, धारवाड आणि कलबुर्गी जिल्ह्यांत शेतकऱ्यांनी राष्ट्रीय महामार्ग आणि राज्य महामार्गांवर ठिय्या देत रात्रभर आंदोलन सुरू ठेवले. त्यामुळे अनेक ठिकाणी वाहतूक विस्कळीत झाली असून प्रवाशांसह मालवाहतूक करणाऱ्या वाहनचालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.

बेळगाव जिल्ह्यात पुणे-बेंगळूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४८ वरील हत्तरगी, कुगनोळी आणि हिरेबागेवाडी टोलनाक्यांजवळ हजारो शेतकरी आंदोलनात सहभागी झाले आहेत. महामार्गावरच स्वयंपाक करून भोजन केल्यानंतर शेतकऱ्यांनी आपल्या मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन मागे न घेण्याचा निर्धार व्यक्त केला. हिरेबागेवाडी परिसरात अनेक ट्रक आणि खासगी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या.

हत्तरगी टोलनाक्याजवळ गुजरात ट्रॅव्हल्सच्या बससह अनेक वाहनांना आंदोलकांनी अडवून परत पाठविल्याचे वृत्त आहे. दरम्यान, हुकेरी तालुक्यातील टोलनाक्याजवळ उसाच्या दरवाढीसाठी एका तरुण शेतकऱ्याने टोलच्या संरचनेवरून उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना घडली. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करून त्याला सुरक्षितपणे ताब्यात घेतल्याचे वृत्त आहे.

हावेरी जिल्ह्यातील शिग्गाव तालुक्यात बंकापूर टोलनाक्याजवळ, तर धारवाड शहराच्या बाहेरील बायपासवरही शेतकऱ्यांनी रास्ता रोको केला. धारवाडमध्ये ११ तासांहून अधिक काळ वाहतूक ठप्प झाल्याने रुग्ण आणि प्रवाशांचे हाल झाले. कलबुर्गीतील राम मंदिर चौकातही शेतकऱ्यांनी रात्रभर जागरण करत बीदर-श्रीरंगपट्टण राज्य महामार्ग रोखून धरला.

शेतकऱ्यांच्या प्रमुख मागण्या

उसाला प्रतिटन किमान ५,५०० रुपये दर निश्चित करावा, साखरेची किमान विक्री किंमत वाढवावी, राज्यात उत्पादित होणारे इथेनॉल केंद्र सरकारने पूर्णपणे खरेदी करावे आणि स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी लागू कराव्यात, अशा मागण्या शेतकरी संघटनांनी केल्या आहेत.

सरकारने तातडीने हस्तक्षेप करून मागण्यांवर तोडगा काढला नाही, तर आंदोलन आणखी तीव्र करून राज्यव्यापी बंद पुकारण्यात येईल, असा इशारा संघटनांनी दिला आहे. त्यामुळे ऊसदराचा प्रश्न आता राज्य सरकारसमोर मोठे आव्हान बनला आहे.

About Belgaum Varta

Check Also

आंतरराष्ट्रीय ख्यातीची जंबो सर्कस 25 आॕक्टो.पर्यंत सीपीएड मैदानावर

Spread the love  बेळगांव : जगप्रसिद्ध जंबो सर्कस बेळगाव शहरात दाखल झाली असून, आंतरराष्ट्रीय कलाकारांच्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *