


बेळगाव : रांगोळीच्या रंगांतून सर्जनशीलतेचा आविष्कार घडविण्यासाठी बेळगावात गुरुवारी (दि. १५ ऑक्टोबर) ‘रॅपिड रांगोळी स्पर्धे’चे आयोजन करण्यात आले आहे. रोटरॅक्ट क्लब ऑफ वेणुग्राम–बेळगाव आणि रोटरी क्लब ऑफ वेणुग्राम–बेळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने, सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळ ‘बेळगावची आदिशक्ती’ यांच्या सहकार्याने ही स्पर्धा होणार आहे.
केळकर बाग येथील ‘बेळगावची आदिशक्ती’ मंडपात सायंकाळी ७ वाजता स्पर्धेला सुरुवात होईल. स्पर्धकांना अवघ्या १५ मिनिटांत आकर्षक रांगोळी साकारायची असून, विषयाचे बंधन नसल्याने सहभागी आपल्या कल्पकतेला मुक्तपणे रंग देऊ शकतील. वेळेचे नियोजन, रंगसंगती, सुबकता आणि कलात्मकता यांची कसोटी या स्पर्धेत लागणार आहे.
रांगोळीप्रेमी आणि नवोदित कलाकारांसाठी आपले कौशल्य दाखविण्याची ही अनोखी संधी आहे. इच्छुक स्पर्धकांनी आणि कलाप्रेमींनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

Belgaum Varta Belgaum Varta