


२० ऑक्टोबर अंतिम मुदत; ‘अन्नसेवा’ ॲपद्वारे घरबसल्या प्रक्रिया पूर्ण करण्याची सुविधा
बेळगाव : रेशनकार्डधारकांसाठी ई-केवायसी पूर्ण करण्याची अंतिम मुदत २० ऑक्टोबर असून, प्रक्रिया अपूर्ण असलेल्या लाभार्थ्यांकडे आता केवळ काही दिवस शिल्लक आहेत. मुदतीत ई-केवायसी पूर्ण न केल्यास रेशन वितरणात अडचणी येण्याची शक्यता असल्याने लाभार्थ्यांनी तातडीने कार्यवाही करावी, असे आवाहन अन्न व नागरी पुरवठा खात्याने केले आहे.
ई-केवायसीसाठी रेशन दुकानात जाण्याची गरज भासू नये, यासाठी खात्याने ‘अन्नसेवा’ ॲपद्वारे घरबसल्या ही प्रक्रिया पूर्ण करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. मोबाईलच्या माध्यमातून ई-केवायसी करता येत असल्याने लाभार्थ्यांचा वेळ आणि श्रम वाचणार आहेत. त्यामुळे प्रलंबित लाभार्थ्यांनी या सुविधेचा लाभ घेऊन मुदतीपूर्वी प्रक्रिया पूर्ण करावी.
खात्याच्या आकडेवारीनुसार, राज्यातील एकूण २.६७ कोटी लाभार्थ्यांपैकी सुमारे २.६ कोटी लाभार्थ्यांची ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण झाली आहे. मात्र, अद्यापही काही लाभार्थ्यांची प्रक्रिया बाकी असल्याने ती वेळेत पूर्ण करण्याचे आव्हान खात्यासमोर आहे.
मुदत संपल्यानंतर होणारी संभाव्य गैरसोय टाळण्यासाठी लाभार्थ्यांनी शेवटच्या दिवसाची वाट न पाहता ई-केवायसी पूर्ण करावी. रेशन वितरणात अडथळे निर्माण होऊ नयेत, यासाठी प्रत्येक पात्र लाभार्थ्याने या प्रक्रियेला प्राधान्य द्यावे, असे आवाहन खात्यातर्फे करण्यात आले आहे.

Belgaum Varta Belgaum Varta