


निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवर आक्षेप; विविध संघटनांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
बेळगाव : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या कार्यपद्धतीवर आक्षेप घेत त्यांच्या राजीनाम्याची मागणी प्रोग्रेसिव्ह रायटर्स असोसिएशन, अंधश्रद्धा निर्मूलन समिती, जीवन विवेक प्रतिष्ठान आणि भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने करण्यात आली आहे. यासंदर्भात संघटनांच्या प्रतिनिधींनी बेळगावच्या जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर केले.
विशेष सखोल मतदार यादी पुनरीक्षण (एसआयआर) प्रक्रियेद्वारे मोठ्या संख्येने मतदारांची नावे वगळण्यात आल्याचा आरोप निवेदनातून करण्यात आला आहे. तसेच, निवडणूक प्रक्रियेतील कथित हस्तक्षेप आणि फॉर्म-६ मधील बदलांबाबतही संघटनांनी प्रश्न उपस्थित केले आहेत.
निवडणूक आयोगाच्या अंतर्गत कामकाजात मतभेद असल्याचे नमूद करत, मुख्य निवडणूक आयुक्तांच्या काही निर्णयांवर अन्य निवडणूक आयुक्तांनी आक्षेप घेतल्याच्या वृत्ताचाही निवेदनात उल्लेख करण्यात आला आहे.
निवडणूक आयोगाच्या स्वायत्ततेवर आणि निष्पक्षतेवर परिणाम होत असल्याचा आरोप करत, ज्ञानेश कुमार यांच्या कार्यपद्धतीची निष्पक्ष चौकशी करण्यात यावी, तसेच त्यांनी तातडीने राजीनामा द्यावा, अशी मागणी संघटनांनी केली आहे. चौकशीतील वस्तुस्थिती जनतेसमोर आणण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.

Belgaum Varta Belgaum Varta