


सीबीआय अधिकारी असल्याचा बनाव; व्हिडिओ कॉलद्वारे धमकावून आठवडाभरात उकळले लाखो रुपये
बेळगाव : सीबीआयचे अधिकारी असल्याचे भासवून डिजिटल अरेस्टची भीती दाखवत सायबर भामट्यांनी टिळकवाडी येथील ७२ वर्षीय निवृत्त अधिकाऱ्याला तब्बल ४२ लाख ४० हजार रुपयांना गंडा घातला. मोबाईल क्रमांकाचा वापर आक्षेपार्ह संदेश प्रसारित करण्यासाठी झाल्याचा आरोप करून आरोपींनी त्यांना कारवाईची धमकी दिली. त्यानंतर ३ ते ९ ऑक्टोबरदरम्यान विविध बँक खात्यांमध्ये टप्प्याटप्प्याने पैसे हस्तांतरित करून घेतले. या प्रकरणी बेळगाव शहरातील सायबर गुन्हे पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
पोलिसांत दाखल तक्रारीनुसार, टिळकवाडी येथील श्री. कुलकर्णी यांच्याशी ३ ऑक्टोबर रोजी सायबर भामट्यांनी मोबाईलवरून संपर्क साधला. सुरुवातीला त्यांनी कुलकर्णी यांच्या कुटुंबातील सदस्यांविषयी माहिती जाणून घेतली. त्यानंतर व्हॉट्सॲप व्हिडिओ कॉल करून विश्वास संपादन करण्याचा प्रयत्न केला.
फोन करणाऱ्या व्यक्तीने आपण ‘विजय कना’ नावाचा आयपीएस अधिकारी असून सीबीआयशी संबंधित असल्याचे सांगितले. कुलकर्णी यांच्या नावावर असलेल्या मोबाईल क्रमांकाचा वापर आक्षेपार्ह संदेश प्रसारित करण्यासाठी झाल्याचा आरोप करत त्यांना गंभीर कारवाईची भीती दाखवण्यात आली. त्यानंतर डिजिटल अरेस्ट केल्याचे भासवून त्यांच्यावर मानसिक दबाव आणण्यात आला.
या धमक्यांमुळे घाबरलेल्या कुलकर्णी यांच्याकडून ३ ते ९ ऑक्टोबर या आठवडाभराच्या कालावधीत वेगवेगळ्या बँक खात्यांमध्ये टप्प्याटप्प्याने पैसे जमा करून घेण्यात आले. या प्रकारात त्यांची एकूण ४२ लाख ४० हजार रुपयांची फसवणूक झाल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
या प्रकरणी सायबर गुन्हे पोलिसांनी तक्रारीच्या आधारे तपास सुरू केला आहे.

Belgaum Varta Belgaum Varta