


यमगर्णी वेदगंगा नदीची स्थिती; नदीवरील जॅकवेलमधील पाणीपुरवठा बंद
निपाणी (वार्ता) : निपाणी शहर आणि उपनगरात पाणीपुरवठा होणाऱ्या यमगर्णी येथील वेदगंगा नदीपात्र कोरडे पडल्याने नदीवरील जॅकवेलमधून जवाहर तलावाला होणारा पाणीपुरवठा बंद झाला आहे. त्यामुळे शहर आणि उपनगराला आत्तापासूनच पिण्याच्या पाण्याची समस्या भेडसावात आहे. परिणामी नागरिकांना पाण्याचा वापर काटकसरीने करावा लागणार आहे. गतवर्षी या काळात वेदगंगा नदी काठोकाठ भरली होती, मात्र यंदा पावसाअभावी कोरडी ठाकर पडली आहे.

यावर्षी पावसाने दडी मारल्याने ऐन पावसाळ्यात या भागातील अनेक नद्यांचे नदी पात्रे कोरडे पडू लागली आहेत. परिणामी शासनाने बेळगाव जिल्हा सध्या दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर केला आहे. त्यामुळे दुष्काळ परिस्थितीला सामोरे जातो ना जातो तोवर पिण्याच्या पाण्याची समस्या भेडसावू लागल्याने सद्या तरी पाणी जपून वापरण्याची तयारी निपाणीकरांना करावी लागणार आहे.
यमगर्णी वेदगंगा नदीची पाणी जॅकवेलच्या माध्यमातून निपाणी तलावात सोडण्यात येते. पण नदी पात्र कोरडे पडल्याने जॅकवेलवरील दोन्ही मोटारी बंद आहेत.
गेल्यावर्षी चांगला पाऊस झाल्याने या नदीला दोन वेळा पूर आला होता. मात्र, यंदा त्याच ठिकाणी चित्र पूर्णपणे पालटले आहे. पाण्याने भरलेली नदी आता कोरडी पडत चालली आहे. पाण्याअभावी ऊस, भाजीपाला या खरीप पिकांच्या उत्पादनाबाबत शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. पिकांची बवा खुंटल्याने शेतकरी चिंताग्रस्त बनला आहे.
——————————————————————–
‘यंदा पाऊस कमी झाल्याने वेदंगा नदीतील पाणी कमी झाले आहे. परिणामी जवारहर तलावात होणारा पाण्याचा उपसा थांबला आहे. उपलब्ध पाणी देण्याचा प्रयत्न सुरू असून नागरिकांनी काटकसरीने पाणी वापरावे.’
-गणपती पाटील, नगरपालिका आयुक्त, निपाणी

Belgaum Varta Belgaum Varta