Friday , October 23 2026
Breaking News

मानवी मूल्यांची जाणीव करून देणारी कविताच खरी जिवंत कविता : प्रा. अनिल सामंत

Spread the love

 

शब्दगंध कविमंडळ संघाचा ३६ वा वर्धापन दिन उत्साहात; उर्मिला शहा यांच्या चौथ्या कवितासंग्रहाचे प्रकाशन

बेळगाव : केवळ व्यासपीठावर टाळ्या मिळवण्यासाठी लिहिलेली कविता अल्पजीवी ठरते. अनुभवांचे चैतन्य जपणारी, वाचकाच्या अंतर्मनाला स्पर्श करून त्याला अंतर्मुख करणारी आणि जीवनाकडे पाहण्याची नवी दृष्टी देणारी कविता हीच खऱ्या अर्थाने जिवंत कविता असते. मानवी मूल्यांची जाणीव करून देणाऱ्या अशा कवितेचे समाजजीवनात अनन्यसाधारण महत्त्व आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक तथा गोवा मराठी अकादमीचे अध्यक्ष प्रा. अनिल सामंत यांनी केले.

राज्य मराठी विकास संस्था, मुंबई यांच्या प्रेरणेने शब्दगंध कविमंडळ संघ, बेळगाव यांच्या ३६ व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित साहित्यिक कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी कवयित्री उर्मिला शहा यांच्या चौथ्या कवितासंग्रहाचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले.

प्रा. सामंत म्हणाले, उर्मिला शहा यांच्या कवितांमध्ये भाषेतील विविध शक्यतांचा प्रभावी वापर दिसून येतो. प्रेम, पाऊस, निसर्ग आणि मानवी नात्यांतील सूक्ष्म भावतरंग त्यांनी अत्यंत संवेदनशीलतेने शब्दबद्ध केले आहेत. त्यांच्या कवितांतून मानवी भावविश्वाचे विविध पैलू उलगडतात, तर जगण्याला अर्थपूर्णता देणारे अनुभव प्रभावीपणे व्यक्त होतात. सीमाभागात गेल्या ३६ वर्षांपासून मराठी साहित्याची चळवळ अखंडपणे जिवंत ठेवणाऱ्या शब्दगंध कविमंडळ संघाचेही त्यांनी विशेष कौतुक केले.

कार्यक्रमाच्या प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते रोपट्याला पाणी घालून उद्घाटन करण्यात आले. सुधाकर गावडे यांनी स्वागत केले. शब्दगंधचे अध्यक्ष प्रा. अशोक आलगोंडी यांनी प्रास्ताविकातून संस्थेच्या ३६ वर्षांच्या साहित्यिक वाटचालीचा आणि विविध उपक्रमांचा आढावा घेतला. परशुराम खेमणे, गुरुनाथ किरमटे आणि स्मिता किल्लेकर यांनी मान्यवरांचा परिचय करून दिला.

प्रमुख वक्ते चंद्रकांत बाबर यांनी आपल्या परखड मनोगतातून स्त्रीजीवन आणि समकालीन सामाजिक वास्तवावर भाष्य केले. ते म्हणाले, उर्मिला शहा यांची कविता सामाजिक चौकटीत अडकलेल्या स्त्रीच्या भावनांची कोंडी फोडते आणि तिला स्वतःच्या अस्तित्वाची जाणीव करून देते. आजच्या समाजात बाह्य देखाव्याला महत्त्व वाढत असताना माणुसकी मात्र हरवत चालली आहे. जात, धर्म आणि लिंगभेदाच्या पलीकडे जाऊन निर्मळ माणूस म्हणून जगण्याची जाणीव निर्माण होत नाही, तोपर्यंत खरी मुक्ती शक्य नाही. कला ही संस्कृती आणि भाषेच्याही आधी जन्माला आली असून, माणसाच्या जगण्याला दिशा देण्याचे सामर्थ्य तिच्यात आहे, असेही त्यांनी नमूद केले.

कवयित्री उर्मिला शहा यांनी मनोगतात आपल्या काव्यलेखनामागील प्रेरणा, अनुभव आणि साहित्यिक वाटचालीचा वेध घेतला.

या कार्यक्रमाला प्रा. सुभाष सुंठणकर, डॉ. चंद्रकांत पोतदार, प्रा. आनंद मेणसे, बी. जी. पाटील, शिवाजी शिंदे, अनिल आजगावकर यांच्यासह ज्येष्ठ साहित्यिक, कवी, साहित्यप्रेमी तसेच शब्दगंध कविमंडळ संघाचे पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपाध्यक्ष बसवंत शहापूरकर यांनी सूत्रसंचालन केले, तर सोनिया शहा यांनी आभार मानले.

About Belgaum Varta

Check Also

आंतरराष्ट्रीय ख्यातीची जंबो सर्कस 25 आॕक्टो.पर्यंत सीपीएड मैदानावर

Spread the love  बेळगांव : जगप्रसिद्ध जंबो सर्कस बेळगाव शहरात दाखल झाली असून, आंतरराष्ट्रीय कलाकारांच्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *