


कित्तूर : कित्तूर उत्सवाचा उत्साह सुरू असतानाच राष्ट्रीय महामार्गालगत असलेल्या वीरराणी कित्तूर चन्नम्मा यांच्या पुतळ्याचा तलवार धरलेला हात तुटल्याची घटना घडली आहे. या प्रकारामुळे स्थानिक नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे.
कित्तूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली. लिफ्टच्या साहाय्याने पुतळ्याची स्वच्छता करताना कामगारांच्या अनावधानाने हाताचा भाग तुटला असावा, असा प्राथमिक संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.
घटनेची माहिती मिळताच तालुका प्रशासनाने तातडीने पुतळा भगव्या कपड्याने झाकला. बैलहोंगलचे पोलीस उपअधीक्षक वीरय्या हिरेमठ यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. परिस्थितीवर लक्ष ठेवण्यासाठी कित्तूर पोलिसांना तैनात करण्यात आले आहे.
दरम्यान, पुतळ्याच्या हानी झालेल्या भागाची दुरुस्ती युद्धपातळीवर सुरू आहे. कित्तूर उत्सवाच्या पार्श्वभूमीवर या घटनेमुळे नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले असून, पुतळ्याची योग्य काळजी घेण्याची मागणी होत आहे.

Belgaum Varta Belgaum Varta