Friday , October 23 2026
Breaking News

एक कोटींच्या आर्थिक गैरव्यवहाराच्या आरोपातून मानसिक छळ; भागीदाराची आत्महत्या

Spread the love

 

आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी चौघांविरुद्ध काकती पोलिसांत गुन्हा

बेळगाव : कंपनीत एक कोटी रुपयांचा आर्थिक गैरव्यवहार केल्याचा आरोप करून वारंवार मानसिक त्रास दिल्याने एका ५८ वर्षीय भागीदाराने आत्महत्या केल्याची तक्रार काकती पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे. याप्रकरणी आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपाखाली चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कडप्पा रामप्पा कुरणी (वय ५८, रा. हिप्परगी गल्ली, कोचेरी, ता. उपकेरी, जि. बेळगाव) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. त्यांच्या पत्नी अनिता कुरणी यांनी यासंदर्भात पोलिसांत तक्रार दिली आहे.

तक्रारीनुसार, कुरणी आणि संशयित आरोपी गेल्या १२ ते १३ वर्षांपासून हेंबाळे येथील ‘संगम फीड्स अँड फार्म’ या व्यवसायात भागीदार म्हणून कार्यरत होते. मागील चार ते पाच वर्षांपासून कुरणी कंपनीच्या व्यवस्थापकीय संचालकपदाची जबाबदारी सांभाळत होते.

दरम्यान, कंपनीत एक कोटी रुपयांचा आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा आरोप अन्य भागीदार यमनाप्पा भागाई, मल्लाप्पा धुंडाप्पा, शिवलिंग बसवराज कोठेवाले आणि रामचंद्र ठाकूर यांनी कुरणी यांच्यावर केला होता. गैरव्यवहाराची संपूर्ण रक्कम त्यांनीच भरून द्यावी, असा तगादा संशयितांकडून लावण्यात येत होता. यासाठी ते वारंवार कुरणी यांच्या घरी जाऊन त्यांना मानसिक त्रास देत असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

या सततच्या मानसिक त्रासाला कंटाळून कुरणी यांनी आत्महत्या केल्याचा आरोप त्यांच्या पत्नीने तक्रारीत केला आहे. या तक्रारीच्या आधारे काकती पोलिसांनी चौघांविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास सुरू आहे.

About Belgaum Varta

Check Also

आंतरराष्ट्रीय ख्यातीची जंबो सर्कस 25 आॕक्टो.पर्यंत सीपीएड मैदानावर

Spread the love  बेळगांव : जगप्रसिद्ध जंबो सर्कस बेळगाव शहरात दाखल झाली असून, आंतरराष्ट्रीय कलाकारांच्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *