Friday , October 23 2026
Breaking News

चारित्र्याच्या संशयातून पत्नीची हत्या; पतीला अटक

Spread the love

 

बेळगाव : पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत दारूच्या नशेत पतीने तिची हत्या केल्याची धक्कादायक घटना बेळगाव शहरातील हनुमाननगर येथे घडली आहे. अश्विनी हेगडे असे मृत महिलेचे नाव असून, या प्रकरणी तिचा पती विठ्ठल हेगडे याला एपीएमसी पोलिसांनी अटक केली आहे. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे.

धारवाड जिल्ह्यातील चिक्कमल्लिगवाड येथील अश्विनी आणि बैलहोंगल तालुक्यातील विठ्ठल हेगडे यांचा सुमारे दहा वर्षांपूर्वी विवाह झाला होता. विवाहानंतर उदरनिर्वाहासाठी हे दाम्पत्य बेळगाव शहरात स्थायिक झाले होते. त्यांना दोन मुले आहेत. मात्र, गेल्या काही दिवसांपासून पती-पत्नीमध्ये वारंवार वाद होत असल्याची माहिती समोर आली आहे.

विठ्ठल हा पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत असल्याने त्यांच्यात सतत भांडणे होत होती. दसरा सणानिमित्त अश्विनी माहेरी गेल्या होत्या. आजारी असलेल्या सासऱ्यांना जेवण देण्यासाठी त्या घरी आल्या असताना ही घटना घडल्याचे वृत्त आहे.

यावेळी दारूच्या नशेत असलेल्या विठ्ठलने पत्नीच्या चारित्र्यावरून तिच्याशी वाद घातला. हा वाद विकोपाला गेल्यानंतर त्याने अश्विनी यांच्यावर हल्ला करून त्यांची हत्या केल्याचा आरोप त्यांच्या आईने केला आहे.

घटनेची माहिती मिळताच एपीएमसी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. या प्रकरणी विठ्ठल हेगडे याला अटक करण्यात आली असून, एपीएमसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

दहा वर्षांचा संसार या दुर्दैवी घटनेमुळे संपुष्टात आल्याने दोन मुलांच्या डोक्यावरील आईचे छत्र हरपले आहे. सणासुदीच्या काळात घडलेल्या या घटनेमुळे हनुमाननगर परिसरात हळहळ व्यक्त होत असून, दोन्ही मुलांच्या भविष्याबाबत चिंता व्यक्त केली जात आहे.

About Belgaum Varta

Check Also

आंतरराष्ट्रीय ख्यातीची जंबो सर्कस 25 आॕक्टो.पर्यंत सीपीएड मैदानावर

Spread the love  बेळगांव : जगप्रसिद्ध जंबो सर्कस बेळगाव शहरात दाखल झाली असून, आंतरराष्ट्रीय कलाकारांच्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *