


दहा ते बारा दिवसांतून एकदा पाणीपुरवठा; टँकरद्वारे तहान भागविण्याचा प्रयत्न
बेळगाव : पावसाने दीर्घकाळ ओढ दिल्याने बेळगाव शहरावर आतापासूनच जलसंकटाचे सावट गडद होऊ लागले आहे. शहरात अनेक ठिकाणी पाण्यासाठी नागरिकांची वणवण सुरू असून, दहा ते बारा दिवसांतून एकदा पाणीपुरवठा होत असल्याने नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. या परिस्थितीत एल अँड टी कंपनीकडून टँकरद्वारे पाणीपुरवठ्याचे नियोजन करण्यात येत असून, सध्या दहा टँकरच्या माध्यमातून नागरिकांची पाण्याची गरज भागविण्याचा प्रयत्न सुरू आहे.
शहरातील एकूण ५८ प्रभागांपैकी आतापर्यंत केवळ दहा प्रभागांमध्ये २४ तास पाणीपुरवठा योजनेचे काम पूर्ण झाले आहे. मात्र, या प्रभागांमध्येही चोवीस तास पाणी मिळणे कठीण झाले आहे. त्यामुळे कोट्यवधी रुपये खर्चून राबविण्यात येणाऱ्या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत.
एका नळावर दोन-तीन कुटुंबांचा भार
२४ तास पाणीपुरवठा योजनेअंतर्गत एका मालमत्तेला एक नळजोडणी दिली जात आहे. मात्र, एकाच घरात दोन ते तीन कुटुंबे वास्तव्यास असल्याने उपलब्ध पाण्याचे नियोजन करताना त्यांची मोठी अडचण होत आहे. त्यातच नियमित पाणीपुरवठा होत नसल्याने नागरिकांची चिंता वाढली आहे.
गेल्या दोन महिन्यांपासून पावसाने दडी मारल्याने राज्यातील पाणीटंचाईचे संकट अधिक गडद झाले आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने बेळगावसह अनेक जिल्हे दुष्काळग्रस्त जाहीर केले आहेत.
मागणीनुसार टँकरद्वारे पाणीपुरवठा
नगरसेवकांच्या मागणीनुसार एल अँड टी कंपनीकडून टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. कंपनीच्या ताब्यात एकूण ४३ टँकर असून, त्यापैकी सध्या दहा टँकर पाणी वितरणासाठी वापरण्यात येत आहेत. नागरिकांची गरज आणि नगरसेवकांकडून होणारी मागणी लक्षात घेऊन टँकरची व्यवस्था केली जात आहे.
मात्र, पावसाने आणखी काही दिवस ओढ दिल्यास शहरातील पाणीटंचाई अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांना नियमित आणि पुरेसा पाणीपुरवठा करण्यासाठी प्रशासन व संबंधित यंत्रणांना अधिक प्रभावी नियोजन करावे लागणार आहे.

Belgaum Varta Belgaum Varta