Friday , October 23 2026
Breaking News

१ नोव्हेंबर काळा दिन गांभीर्याने पाळणार : शहर म. ए. समितीच्या बैठकीत निर्धार; गल्लीगल्लीत बैठका घेऊन जनजागृती करणार

Spread the love

बेळगाव : आगामी १ नोव्हेंबर रोजी पाळण्यात येणाऱ्या काळ्या दिनाच्या पार्श्वभूमीवर मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीने आंदोलनाची तयारी सुरू केली आहे. शहरातील गल्लीगल्लीत बैठका घेऊन जनजागृती करण्यासह आंदोलनात मराठी भाषिकांचा व्यापक सहभाग मिळविण्याची रणनीती समितीने आखली आहे. यासंदर्भात समितीचे अध्यक्ष प्रकाश मरगाळे यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच आढावा बैठक पार पडली.

या बैठकीत मराठी भाषिकांचे प्रश्न, प्रशासनाची भूमिका आणि काळ्या दिनाच्या आंदोलनाच्या पूर्वतयारीवर चर्चा करण्यात आली. जिल्हाधिकाऱ्यांच्या अलीकडील वादग्रस्त वक्तव्याच्या निषेधार्थ १ नोव्हेंबर रोजी काळा दिन पाळण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.

गल्लीगल्लीत बैठका घेऊन जनजागृती

काळ्या दिनाच्या आंदोलनाची माहिती सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी शहरातील विविध भागांत लहान बैठका घेण्याचे ठरविण्यात आले आहे. चार ते पाच गल्ल्यांचा परिसर निश्चित करून तेथे बैठका घेतल्या जाणार असून, आवश्यकतेनुसार समितीचे वरिष्ठ पदाधिकारी उपस्थित राहून कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहेत.

प्रशासनाकडून परवानगी मिळाली किंवा नाही, तरी समितीने निश्चित केलेल्या ठिकाणी मराठी भाषिक आणि कार्यकर्त्यांनी सकाळी लवकर मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन अध्यक्ष प्रकाश मरगाळे यांनी केले. आंदोलनातून मराठी जनतेच्या भावना प्रशासनापर्यंत पोहोचविण्याचा निर्धारही त्यांनी व्यक्त केला.

७० वर्षांच्या लढ्याचा उल्लेख

समितीचे सरचिटणीस मालोजीराव अष्टेकर यांनी मराठी भाषिकांच्या गेल्या सात दशकांपासून सुरू असलेल्या सीमाप्रश्नाच्या लढ्याचा उल्लेख केला. प्रतिकूल परिस्थितीतही मराठी जनता आपल्या मागण्यांवर ठाम राहिली असून, मराठी अस्मितेच्या प्रश्नावर जनतेची एकजूट कायम असल्याचे त्यांनी सांगितले. आगामी आंदोलनातही मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन त्यांनी केले.

रणजीत चव्हाण-पाटील यांनीही आंदोलनाबाबत भूमिका मांडली. सीमाप्रश्नाचा लढा संपल्याचे मानणाऱ्यांचा समज चुकीचा असल्याचे सांगून, संयम आणि ठामपणाने पुढील वाटचाल सुरू ठेवली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले. मराठी भाषिकांची एकजूट अधिक बळकट होत असून, सर्वांच्या सहकार्याने प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न सुरू राहतील, असेही त्यांनी नमूद केले. सीमाप्रश्नासंदर्भातील न्यायालयीन लढ्याचा सर्वोच्च न्यायालयात सातत्याने पाठपुरावा सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

या बैठकीला ॲड. अमर यळ्ळूरकर, नगरसेविका वैशाली भातकांडे, नगरसेवक शिवाजी मंडोळकर, नेताजी जाधव, रमाकांत कोंडुस्कर, शिवराज पाटील, अंकुश केसरकर, श्रीकांत कदम, उमेश पाटील, राजू बिर्जे यांच्यासह मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

आंतरराष्ट्रीय ख्यातीची जंबो सर्कस 25 आॕक्टो.पर्यंत सीपीएड मैदानावर

Spread the love  बेळगांव : जगप्रसिद्ध जंबो सर्कस बेळगाव शहरात दाखल झाली असून, आंतरराष्ट्रीय कलाकारांच्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *