Friday , October 23 2026
Breaking News

बेळगावचा नवरात्र-दसरा महोत्सव उत्साहात संपन्न; सहकार्य करणाऱ्या सर्वांचे मध्यवर्ती नवरात्र दसरा महामंडळाने मानले आभार

Spread the love

 

बेळगाव : मध्यवर्ती सार्वजनिक नवरात्र दसरा महोत्सव महामंडळ, बेळगाव यांच्या वतीने दि. ११ ते २० ऑक्टोबर २०२६ या कालावधीत आयोजित करण्यात आलेला नवरात्र-दसरा महोत्सव मोठ्या उत्साहात, भक्तिमय वातावरणात आणि शांततेत संपन्न झाला. या महोत्सवाच्या यशस्वी आयोजनासाठी सहकार्य करणाऱ्या बेळगाव शहर व उपनगरांतील नागरिकांसह विविध देवस्थान मंडळे, सामाजिक संस्था, लोकप्रतिनिधी, शासकीय अधिकारी आणि कर्मचारी यांचे महामंडळाच्या वतीने मनःपूर्वक आभार व्यक्त करण्यात आले.

बेळगाव शहराला धार्मिक, सांस्कृतिक आणि ऐतिहासिक परंपरेचा समृद्ध वारसा लाभला आहे. या परंपरेचे जतन करण्याबरोबरच नवरात्र-दसरा उत्सव भक्तिभावाने आणि शिस्तबद्ध पद्धतीने साजरा व्हावा, यासाठी मध्यवर्ती सार्वजनिक नवरात्र दसरा महोत्सव महामंडळाच्या वतीने दरवर्षी विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येते. यंदाही नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद आणि विविध घटकांचे सहकार्य लाभल्यामुळे उत्सव आनंददायी वातावरणात पार पडला.

या उत्सवाच्या यशस्वी आयोजनासाठी मार्गदर्शन व सहकार्य करणारे, जिल्हा पालकमंत्री, जिल्हा प्रशासन, महानगरपालिका प्रशासन, पोलीस प्रशासन, अग्निशमन ,विद्युत प्रशासन, विविध शासकीय विभागांचे अधिकारी व कर्मचारी, स्वच्छता कर्मचारी, मंडप व सजावट व्यावसायिक, साउंड सिस्टिम व्यावसायिक, प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी, विविध देवस्थान मंडळांचे पदाधिकारी, सामाजिक संस्थांचे कार्यकर्ते आणि सर्व सेवाभावी संस्थांचे महामंडळाने विशेष आभार मानले आहेत.

उत्सवादरम्यान शहरातील स्वच्छता, वाहतूक व्यवस्था, सुरक्षितता आणि नागरिकांच्या सोयीसुविधांसाठी संबंधित यंत्रणांनी केलेले सहकार्य महत्त्वपूर्ण ठरले. विविध स्तरांवरून मिळालेल्या सहकार्यामुळे उत्सवाचे नियोजन अधिक प्रभावीपणे करता आले. तसेच बेळगावकर नागरिकांनी दाखविलेला संयम, शिस्त, उत्साह आणि धार्मिक भावना यामुळे उत्सवाला विशेष शोभा प्राप्त झाली.

प्राचार्य आनंद आपटेकर यांनी व्यक्त केले आभार

मध्यवर्ती सार्वजनिक नवरात्र दसरा महोत्सव महामंडळाचे अध्यक्ष प्राचार्य आनंद आपटेकर यांनी उत्सवाच्या यशस्वितेसाठी प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरीत्या योगदान देणाऱ्या सर्वांचे आभार व्यक्त केले. भविष्यातही बेळगावच्या धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरा अधिक उत्साहाने जपण्यासाठी नागरिकांनी असेच सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले.

यावेळी महामंडळाचे मानद अध्यक्ष रमाकांत दादा कोंडुसकर, अध्यक्ष प्राचार्य आनंद आपटेकर, स्वागताध्यक्ष मालोजीराव अष्टेकर, उपाध्यक्ष संदीप कामुले, जनसंपर्क प्रमुख विकास कलघटगी, मराठी विद्यानिकेतन संस्थेचे सुभाष ओऊळकर यांच्यासह महामंडळाच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी उत्सवासाठी सहकार्य करणाऱ्या सर्व घटकांचे मनःपूर्वक आभार मानले.

“आपले सहकार्य आणि प्रेम असेच पुढेही लाभो, हीच अपेक्षा!” या भावनेतून महामंडळाने सर्व बेळगावकरांचे आभार मानत आगामी काळातही धार्मिक, सामाजिक आणि सांस्कृतिक उपक्रमांसाठी सर्वांनी एकत्रितपणे सहकार्य करावे, अशी अपेक्षा व्यक्त केली.

About Belgaum Varta

Check Also

आंतरराष्ट्रीय ख्यातीची जंबो सर्कस 25 आॕक्टो.पर्यंत सीपीएड मैदानावर

Spread the love  बेळगांव : जगप्रसिद्ध जंबो सर्कस बेळगाव शहरात दाखल झाली असून, आंतरराष्ट्रीय कलाकारांच्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *