



विविध वस्तूंच्या खरेदीसाठी नागरिकांची झुंबड; वस्त्रदालने, फटाके, फराळाचे स्टॉल आणि इलेक्ट्रॉनिक्स दुकानांमध्ये रात्री उशिरापर्यंत गर्दी
बेळगाव : दिवाळी सणाचा उत्साह सर्वत्र ओसंडून वाहत असून, गजबजलेल्या बाजारपेठा हे त्याचे मूर्तिमंत उदाहरण ठरत आहेत. वसुबारसेपासून दिवाळी पर्वाला प्रारंभ झाला असून, रविवारी अभ्यंगस्नान आणि लक्ष्मीपूजन असल्याने शनिवारी खरेदीचा मुहूर्त साधण्यासाठी नागरिकांनी बाजारपेठांमध्ये मोठी गर्दी केली होती.
पांगुळ गल्ली, गणपत गल्ली, मारुती गल्ली, खडे बाजार, रामदेव गल्ली यांसह शहरातील प्रमुख बाजारपेठांमध्ये विविध प्रकारच्या वस्तूंच्या खरेदीसाठी हजारो नागरिक दाखल झाले होते. चैतन्य, मांगल्य, आनंद आणि उत्साह घेऊन येणाऱ्या दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर वस्त्रदालनांपासून फटाक्यांच्या दुकानांपर्यंत सर्वत्र खरेदीची लगबग दिसून आली. आकाशकंदील, सौंदर्यप्रसाधने, साबण, उटणे, तेल, मेहंदी, रांगोळ्या, बांगड्या, पर्स तसेच विविध गृहपयोगी वस्तूंच्या खरेदीत महिलावर्ग व्यस्त असल्याचे चित्र पाहायला मिळाले.
दिवाळी म्हटले की फराळाची मेजवानी आलीच. त्यामुळे फराळ तयार करण्यासाठी लागणाऱ्या साहित्याच्या खरेदीसाठी मागील आठवड्यापासूनच किराणा दुकानांमध्ये गर्दी होत आहे. त्याचबरोबर बाजारपेठेत ठिकठिकाणी तयार फराळाचे स्टॉलही उभारण्यात आले आहेत. वेळेअभावी घरगुती फराळ तयार करण्याऐवजी तयार फराळ खरेदी करण्याकडेही महिलांचा कल वाढल्याचे दिसून आले. त्यामुळे शनिवारी सकाळपासूनच बाजारपेठांमध्ये खरेदीसाठी मोठी रेलचेल होती.
दिवाळीतील लक्ष्मीपूजन आणि पाडव्याच्या मुहूर्तावर नवीन वस्तू खरेदी करण्याची परंपरा आहे. मात्र, या दिवशी होणारी गर्दी लक्षात घेऊन अनेकांनी शनिवारीच इलेक्ट्रॉनिक्स वस्तू आणि वाहनांच्या खरेदीचे बुकिंग करण्यास पसंती दिली. मोबाईल, टीव्ही, फ्रीज, वॉशिंग मशीन, शिलाई मशीन, होम थिएटर, आटाचक्की यांसह विविध इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंच्या शोरूममध्ये ग्राहकांची वर्दळ होती. वाहनांच्या शोरूममध्येही नवीन वाहनांच्या बुकिंगसाठी नागरिकांनी गर्दी केली होती.
दिवाळीच्या पार्श्वभूमीवर विविध दुकानदारांनी ग्राहकांसाठी आकर्षक सवलती आणि विशेष ऑफर्स उपलब्ध करून दिल्या आहेत. सवलतींचा लाभ घेत आवश्यक वस्तूंची खरेदी करण्यासाठी नागरिकांची दुकानांमध्ये झुंबड उडाली होती. एकंदरीतच दिवाळीच्या खरेदीचा उत्साह शिगेला पोहोचला असून, शनिवारी रात्री उशिरापर्यंत शहरातील बाजारपेठा आणि व्यापारी संकुले ग्राहकांच्या गर्दीने फुलून गेली होती.
Belgaum Varta Belgaum Varta