



गुजरातमधील महिलेविरोधात एपीएमसी पोलीस स्थानकात फसवणुकीचा गुन्हा दाखल
बेळगाव : युकेचा व्हिसा मिळवून देण्याचे आमिष दाखवून सदाशिवनगर येथील एका डॉक्टरांची तब्बल २८ लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. याप्रकरणी गुजरातमधील मोहिनी जिंजाला या महिलेविरोधात एपीएमसी पोलीस स्थानकात फिर्याद दाखल करण्यात आली असून पोलिसांनी गुन्हा नोंदवून पुढील तपास सुरू केला आहे.
याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सदाशिवनगर येथील डॉ. निलेशकुमार यांनी यासंदर्भात फिर्याद दिली आहे. १८ जून २०२४ ते ३० ऑगस्ट २०२५ या कालावधीत हा प्रकार घडला. डॉ. निलेशकुमार यांच्या मेव्हणीला युकेचा व्हिसा मिळवून देण्याचे आश्वासन गुजरात येथील मोहिनी जिंजाला या महिलेने दिले होते. त्यानुसार व्हिसा प्रक्रियेसाठी तिने डॉ. निलेशकुमार यांच्याकडून टप्प्याटप्प्याने २८ लाख रुपये घेतले.
मात्र, पैसे घेऊनही संबंधित महिलेने व्हिसा मिळवून दिला नाही. व्हिसासाठी दिलेली रक्कम परत मिळेल, या आशेने डॉ. निलेशकुमार यांनी बराच काळ प्रतीक्षा केली. वारंवार व्हिसाबाबत विचारणा करूनही संबंधित महिला विविध कारणे सांगून वेळ मारून नेत होती. अखेर तिने फोन घेणेही बंद केले. त्यामुळे आपली आर्थिक फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले.
यानंतर त्यांनी एपीएमसी पोलीस स्थानकात धाव घेऊन तक्रार दाखल केली. पोलिसांनी संबंधित महिलेविरोधात गुन्हा नोंदविला असून पुढील तपास सुरू आहे.
Belgaum Varta Belgaum Varta