



ऊस, केळीच्या झाडांसह शेवंतीच्या फुलांनाही मागणी
निपाणी (वार्ता) : दिवाळीतील लक्ष्मीपूजनाच्या पार्श्वभूमीवर शनिवारी (ता. ७) निपाणी बाजारपेठेत फुले आणि पूजेच्या साहित्याच्या खरेदीसाठी नागरिकांची मोठी गर्दी झाली होती. यंदा दसऱ्याच्या तुलनेत दिवाळीत झेंडूच्या फुलांना चांगला भाव मिळाल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला.
बाजारपेठेत पिवळ्या व केशरी झेंडूच्या फुलांची मोठ्या प्रमाणात विक्री झाली. झेंडूला प्रतिकिलो ६० ते ७० रुपये, तर शेवंतीला १४० ते १५० रुपये दर मिळाला. पूजेसाठी आवश्यक असलेल्या पाच उसांच्या जुडीसह केळी व कर्दळीच्या झाडांच्या जोडीला ५० ते ६० रुपये दर मिळत होता.
यंदा पावसाने पाठ फिरवल्याने फुलशेतीचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे मागणीच्या तुलनेत फुलांचा पुरवठा कमी झाल्याने दरात वाढ झाली. बेनाडी, भिवशी, तवंदी, सौंदलगा, खडकलाट आणि शिरगुप्पी परिसरातील शेतकरी फुले विक्रीसाठी निपाणी बाजारपेठेत आले होते. झेंडूसह शेवंती, निशिगंध आणि गुलाबाच्या फुलांनाही मागणी होती.
लक्ष्मीपूजनासाठी लागणारे खारीक, खोबरे, सुपारी, गुलाल, हळद-कुंकू, अगरबत्ती, कापूर, वाती, नारळ, नागवेलीची पाने, लक्ष्मीची पावले, पाटावरील कापड, पाच प्रकारची फळे आणि केरसुणीची जोडी खरेदी करण्यासाठी नागरिकांनी दिवसभर गर्दी केली होती.
Belgaum Varta Belgaum Varta