Monday , November 23 2026
Breaking News

गुरुनाथ किरमटे यांच्या कवितांनी रसिकांना घातली भावविश्वाची सफर

Spread the love

 

‘शब्दांच्या पाऊलखुणा’ या काव्यकार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद

बेळगाव : ‘मनास करते शब्दांच्या हवाली, तेव्हा स्फुरते कविता, भावनांना शब्दात गुंफितो आणि जन्मते कविता’ या ओळींमधून आपल्या काव्यलेखनाची भूमिका मांडणाऱ्या गुरुनाथ किरमटे यांनी स्वानुभव, मानवी नातेसंबंध, भावभावना, प्रेम, संयम, सामाजिक जाणीव, गावाशी असलेले नाते आणि मराठी भाषेविषयीची आत्मीयता अशा विविध विषयांवरील कविता सादर केल्या.
राज्य मराठी विकास संस्था, मुंबई यांच्या प्रेरणेने शब्दगंध कवी मंडळ संघ, बेळगाव यांच्या वतीने रविवारी (दि. २२) मराठी विद्यानिकेतनच्या सभागृहात कवी समजून घेताना उपक्रमांतर्गत ‘शब्दांच्या पाऊलखुणा’ या विशेष काव्यकार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. प्रा. अशोक आलगोंडी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक चंद्रशेखर गायकवाड यांनी केले तर परिचय शब्दगंधचे उपाध्यक्ष बसवंत शहापूरकर यांनी केले.
कवी गुरुनाथ किरमटे यांनी आपल्या विविध विषयांवरील कविता सादर करून उपस्थित रसिकांना भावविश्वाची अनोखी सफर घडवली. ‘स्वानुभव’, ‘अशी जन्मते कविता’, ‘संयमी मन’, ‘सांजवेळ’, ‘भावनांचे बाहुपाश’, ‘नाळ’, ‘मर्म’, ‘उतरंड’, ‘मराठीचा सेवेकरी’ आणि ‘आशा संपत नाही’ या त्यांच्या कवितांनी कार्यक्रमात विशेष रंगत आणली.
त्यांच्या कवितांमधून मानवी मनातील भावनिक गुंतागुंत, नात्यांमधील ओलावा, जीवनातील संघर्ष, बदलती सामाजिक परिस्थिती, गावाकडच्या आठवणी आणि मराठी भाषेचे महत्त्व प्रभावीपणे व्यक्त झाले. विशेषतः ‘नाळ’ या कवितेतून गावाशी असलेले भावनिक नाते, तर ‘मराठीचा सेवेकरी’ या कवितेतून मराठी भाषा व साहित्याविषयीची आत्मीयता व्यक्त झाली. ‘आशा संपत नाही’ या कवितेतून मानवी जीवनातील संवेदनशीलता आणि माणुसकीचे महत्त्व अधोरेखित झाले.
गुरुनाथ किरमटे यांच्या कवितांमध्ये साधी, सहज भाषा, अनुभवांची प्रामाणिक अभिव्यक्ती आणि जीवनातील वास्तवाचे संवेदनशील चित्रण दिसून आले. त्यांच्या कविता ऐकताना उपस्थित रसिकांनी उत्स्फूर्त दाद दिली.
या कार्यक्रमापूर्वी उपस्थित कवींचे कवी संमेलन आयोजित करण्यात आले होते. यामध्ये कवी दत्ता घोडके, भरत गावडे, स्नेहल बर्डे, जोतिबा नागवडेकर, स्मिता पाटील, कृष्णा पारवाडकर रोशनी हुंदरे, मधू पाटील, प्रा. मनीषा नाडगौडा, डॉ. संजीवनी खंडागळे, प्रा. शुभदा खानोलकर, अक्षता येळूरकर, अपर्णा पाटील, अशोक सुतार, किरण पाटील आदी कवींनी आपल्या कविता सादर करून कार्यक्रमाची शोभा वाढवली.
शब्दगंध कवी मंडळ संघाचे अध्यक्ष प्रा. अशोक आलगोंडी यांनी अध्यक्षीय भाषणात उपक्रमाचा उद्देश सांगून गुरुनाथ किरमटे यांच्या कवितेचे वैशिष्ट्यांचा उहापोह केला.
यावेळी गुणवंत पाटील, डी. बी. पाटील, निळूभाऊ नार्वेकर, शिवाजी शिंदे, शिवराज पाटील, दीपक किल्लेकर यांच्यासह यांच्यासह साहित्यप्रेमी, कवी आणि रसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुधाकर गावडे यांनी केले तर आभार भरत गावडे यांनी मानले. मराठी कविता आणि कवींच्या अभिव्यक्तीला व्यासपीठ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने आयोजित केलेला हा कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.

About Belgaum Varta

Check Also

बिम्स रुग्णालयाजवळ अमली पदार्थ विक्रीवर एपीएमसी पोलिसांचा छापा; एकाला अटक

Spread the love  ३.६० ग्रॅम हेरॉईन जप्त; ७२ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत बेळगाव : शहरातील …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *