






बेंगळूरू : विद्यार्थ्यांची महाविद्यालयातील उपस्थिती वाढविण्यासह लेक्चर बंक करणाऱ्यांना आळा घालण्यासाठी राज्य सरकारने कृत्रिम बुद्धिमत्तेवर (एआय) आधारित हजेरी प्रणाली लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे महाविद्यालयात नियमित जाणाऱ्या विद्यार्थ्यांच्या उपस्थितीवर आता पालकांनाही थेट लक्ष ठेवता येणार आहे.
राज्यातील सरकारी पदवी महाविद्यालये आणि विद्यापीठांमध्ये एआय आधारित चेहरा ओळख प्रणालीद्वारे विद्यार्थ्यांची हजेरी नोंदविण्यात येणार आहे. हजेरी नोंदविल्यानंतर त्याची माहिती विद्यार्थ्यांच्या पालकांच्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर एसएमएसद्वारे पाठविण्यात येणार आहे. त्यामुळे विद्यार्थी महाविद्यालयात उपस्थित आहे की गैरहजर, याची माहिती पालकांना तत्काळ मिळणार आहे.
पुढील शैक्षणिक सत्रापासून राज्यातील सर्व सरकारी पदवी महाविद्यालये आणि सरकारी विद्यापीठांमध्ये ही प्रणाली लागू करण्याची तयारी सुरू आहे. विद्यार्थ्यांची हजेरी, प्रवेश प्रक्रिया, अभ्यासक्रम आणि शैक्षणिक नियोजनाची माहिती एकाच व्यासपीठावर उपलब्ध करून देणाऱ्या यूयूसीएमएस (UUCMS) प्रणालीशी ही हजेरी व्यवस्था जोडण्यात येणार आहे.
काही खासगी विनाअनुदानित महाविद्यालयांमध्ये यापूर्वीच स्वतंत्र ॲप आणि एसएमएसच्या माध्यमातून पालकांना विद्यार्थ्यांच्या उपस्थितीची माहिती दिली जात आहे. नव्या एआय प्रणालीच्या माध्यमातून अवघ्या काही सेकंदांत ५० विद्यार्थ्यांची हजेरी नोंदविणे शक्य असल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे हजेरी प्रक्रियेला वेग येण्याबरोबरच मानवी हस्तक्षेपही कमी होणार आहे.
दरम्यान, आवश्यक उपस्थितीची अट पूर्ण न झाल्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना परीक्षेला मुकावे लागत असल्याची समस्या आहे. विद्यार्थ्यांची नियमित उपस्थिती वाढविणे, वर्गातील गैरहजेरीला आळा घालणे आणि शैक्षणिक शिस्त निर्माण करणे, या उद्देशाने ही प्रणाली महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचा विश्वास उच्च शिक्षण विभागाने व्यक्त केला आहे.
Belgaum Varta Belgaum Varta