






अनोळखी क्रमांकावरून वारंवार कॉल; मोबाईलवरील लिंक क्लिक करताच बँक खात्यावर सायबर भामट्यांचा डल्ला
बेळगाव : सायबर गुन्हेगारांकडून आर्थिक फसवणुकीसाठी नवनवीन शक्कल लढवली जात असून, त्यांच्या जाळ्यात अडकून नागरिकांना लाखोंचा आर्थिक फटका सहन करावा लागत आहे. असाच एक धक्कादायक प्रकार अनगोळ येथे उघडकीस आला आहे. अनोळखी मोबाईल क्रमांकावरून आलेले कॉल आणि त्यानंतर पाठविण्यात आलेल्या लिंकच्या माध्यमातून सायबर भामट्यांनी एका व्यावसायिकाच्या बँक खात्यावर डल्ला मारला. अवघ्या काही क्षणांत त्यांच्या खात्यातील तब्बल ३ लाख २४ हजार ५९८ रुपये लंपास करण्यात आले. याप्रकरणी रविवारी शहर सायबर क्राईम विभागात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
झटपट कॉलनी, अनगोळ येथील अब्बास अली (वय ४९) या व्यावसायिकाने यासंदर्भात पोलिसांत फिर्याद दिली आहे. पोलीस निरीक्षक श्रीशैल गाभी पुढील तपास करीत आहेत.
१३ नोव्हेंबर रोजी अब्बास अली यांना एका अनोळखी मोबाईल क्रमांकावरून फोन आला. त्यांनी तो स्वीकारला; मात्र पलीकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. काही वेळातच फोन कट झाला. त्यानंतर त्याच क्रमांकावरून वारंवार कॉल येऊ लागले. दरम्यान, त्यांच्या मोबाईलवर एक लिंक पाठविण्यात आली. या लिंकवर क्लिक करताच सायबर गुन्हेगारांनी त्यांच्या बँक खात्यातील ३ लाख २४ हजार ५९८ रुपये अन्य खात्यात वळवून घेतले.
१६ नोव्हेंबर रोजी अब्बास अली यांनी अनगोळ येथील बँक ऑफ इंडियाच्या व्यवस्थापकांची भेट घेऊन खात्यातील व्यवहारांची माहिती घेतली. त्यावेळी त्यांच्या खात्यातून अन्य खात्यात रक्कम वळविण्यात आल्याचे निदर्शनास आले. यानंतर एनसीआरपी पोर्टलवर प्राथमिक स्वरूपात झिरो एफआयआर दाखल करण्यात आला. पुढील तपासासाठी हे प्रकरण शहर सायबर क्राईम विभागाकडे वर्ग करण्यात आले आहे.
अनोळखी कॉलच्या माध्यमातून संपर्क साधून लिंक पाठविणे आणि त्याद्वारे बँक खात्यातील रक्कम लंपास करण्याचा प्रकार पुन्हा समोर आल्याने सायबर गुन्हेगारीचे वाढते आव्हान अधोरेखित झाले आहे. एका अनोळखी कॉलचा विश्वास ठेवणेही किती महागात पडू शकते, याची जाणीव या घटनेने करून दिली आहे.
Belgaum Varta Belgaum Varta