Tuesday , November 24 2026
Breaking News

रानातील पानाफुलांशी हितगुज करणारे प्रयोगशील शेतकरी कै. महादेव कालमणकर मामा!

Spread the love

 

 

कष्ट, जिद्द, साधेपणा आणि सामाजिक बांधिलकी यांचा सुंदर संगम असलेले व्यक्तिमत्त्व म्हणजे कै. महादेव लक्ष्मण कालमणकर मामा!

काही माणसे आपल्या पदाने मोठी होतात, काही संपत्तीने मोठी होतात; पण काही माणसे आपल्या कर्तृत्वाने, स्वभावाने आणि माणुसकीने लोकांच्या मनात कायमचे घर करून राहतात. कै. महादेव कालमणकर मामा हे अशाच व्यक्तिमत्त्वांपैकी एक होते. शेतीशी नाळ जोडलेले, निसर्गाच्या सान्निध्यात रमणारे, सामाजिक कार्यात अग्रेसर असणारे आणि सर्वसामान्यांच्या सुख-दुःखात सहभागी होणारे ते एक अजातशत्रू व्यक्तिमत्त्व होते.

कै. महादेव लक्ष्मण कालमणकर यांचा जन्म २० जुलै १९४५ रोजी देवाचीहट्टी ता.खानापूर येथील एका सात्त्विक आणि प्रेमळ शेतकरी कुटुंबात झाला. त्यांचे बालपण ग्रामीण वातावरणात गेले. मात्र, नियतीने त्यांच्या आयुष्यात लहानपणीच संघर्षाची वाट निर्माण केली. ते केवळ दुसरीपर्यंत शिकले असतानाच मातृछत्र हरपले. त्यामुळे शिक्षण अर्धवट सोडून लहान भावंडांच्या संगोपनाची जबाबदारी त्यांच्यावर आली. वयाच्या अवघ्या दहाव्या वर्षापासून वडिलांना शेतीच्या कामात मदत करण्यास त्यांनी सुरुवात केली. लहान वयातच आलेल्या जबाबदाऱ्या त्यांनी मोठ्या धैर्याने पेलल्या. परिस्थितीशी दोन हात करत कष्टालाच आपले जीवन मानले.

त्याकाळच्या सामाजिक प्रथेनुसार वयाच्या पंधराव्या वर्षी त्यांचा तळवाडे येथील लक्ष्मी नावाच्या मुलीशी विवाह झाला. लक्ष्मी यांनीही त्यांच्या आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर खंबीर साथ दिली. संसाराचा गाडा ओढताना त्यांनी पतीच्या सुख-दुःखात सहभागी होत आयुष्यभर त्यांना साथ दिली. खऱ्या अर्थाने त्या त्यांच्या जीवनप्रवासातील सहचारिणी ठरल्या.

महादेव मामा हे निर्व्यसनी होते. त्यांना मराठी संगीत, कीर्तन आणि प्रवचन यांची विशेष आवड होती. गावातील पंचमंडळीत त्यांना मानाचे स्थान होते. पंच म्हणून काम करताना गावातील प्रश्न सोडविण्यासाठी आणि गावाच्या विकासासाठी त्यांनी नेहमी पुढाकार घेतला. गावकऱ्यांच्या सहकार्याने त्यांनी गावात दोन मंदिरांच्या उभारणीत मोलाचे योगदान दिले. १९८२ साली चकहाटा मंदिर, तर १९९२ साली श्री विठ्ठल-रखुमाई मंदिर बांधण्यात त्यांचा पुढाकार महत्त्वाचा ठरला. धार्मिक कार्याबरोबरच गावातील सामाजिक एकोपा आणि बंधुभाव टिकविण्यासाठी त्यांनी नेहमी प्रयत्न केले.

राजकारणापासून लांब राहून त्यांनी सामाजिक कार्याला प्राधान्य दिले. कोणत्याही पदाची अपेक्षा न ठेवता समाजासाठी काम करणे, हीच त्यांच्या कार्याची खरी ओळख होती. गावातील प्रत्येकाच्या सुख-दुःखात सहभागी होणारा, सर्वांना आपलेसे करणारा आणि सर्वसामान्यांच्या अडचणी समजून घेणारा असा त्यांचा स्वभाव होता.

शिक्षणाची त्यांना मनापासून आवड होती. स्वतःचे शिक्षण परिस्थितीमुळे अपूर्ण राहिले, याची खंत त्यांच्या मनात होती. गावात दळणवळणाची सोय नसणे आणि कुटुंबात एकुलता एक मुलगा असणे अशा कारणांमुळे त्यांनी आपल्या मुलाचे शिक्षण दहावीपर्यंतच केले. मात्र, पुढील पिढीने शिक्षणात प्रगती करावी, या भावनेतून त्यांनी नातवंडांना पदवीपर्यंत शिक्षण घेण्यास प्रोत्साहन दिले. आज त्यांचा मुलगा जांबोटी येथील बहुउद्देशीय सहकारी पतसंस्थेचा अध्यक्ष म्हणून कार्यरत आहे. तसेच तो सामाजिक कार्यातही योगदान देत आहे. आपल्या मुलाने समाजात चांगले स्थान निर्माण करून सामाजिक कार्य करावे, याचा त्यांना सार्थ अभिमान वाटत होता.

कै. महादेव कालमणकर मामा हे केवळ एक प्रगतिशील आणि प्रयोगशील शेतकरी म्हणून प्रसिद्ध नव्हते, तर ते एक सर्वसामान्यांची अस्था असणारे, प्रेमळ आणि मनमिळाऊ माणूस म्हणूनही सर्वश्रुत होते. रानातील पानाफुलांशी हितगुज करणारे त्यांचे व्यक्तिमत्त्व शेतीशी असलेल्या त्यांच्या जिव्हाळ्याची साक्ष देत होते. शेती हा केवळ उदरनिर्वाहाचा व्यवसाय नसून ती एक जीवनपद्धती आहे, अशा भावनेने ते शेतीत रमले होते. कष्टाला प्रतिष्ठा आणि माणुसकीला महत्त्व देणारे त्यांचे जीवन खऱ्या अर्थाने अनुकरणीय होते.

१४ नोव्हेंबर २०२६ रोजी वृद्धापकाळाने त्यांचे निधन झाले आणि एका प्रेमळ, कष्टाळू व समाजाभिमुख व्यक्तिमत्त्वाचा जीवनप्रवास थांबला. त्यांच्या निधनाने कुटुंबीयांनी आपला आधारवड गमावला, तर गावाने एक अनुभवी, समंजस आणि सर्वांना आपलेसे करणारा माणूस गमावला आहे.

माणसाचे मोठेपण त्याने मिळविलेल्या संपत्तीत किंवा पदात नसते, तर त्याने जोडलेल्या माणसांत आणि समाजासाठी केलेल्या कार्यात असते. या अर्थाने महादेव मामा यांचे जीवन समृद्ध होते. त्यांनी जपलेली माणुसकी, सामाजिक बांधिलकी, कष्टाची वृत्ती आणि साधेपणाचे संस्कार पुढील पिढ्यांसाठी निश्चितच प्रेरणादायी ठरतील.

माणूस जातो, पण त्याचे विचार, कार्य आणि आठवणी मागे ठेवून जातो. महादेव मामा यांच्या जीवनकार्याचा सुगंध त्यांच्या आप्तस्वकीयांच्या आणि गावकऱ्यांच्या मनात सदैव दरवळत राहील.

कै. महादेव कालमणकर मामा यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो, हीच परमेश्वरचरणी प्रार्थना!

– शिवाजी हसनेकर, उचवडे.

About Belgaum Varta

Check Also

हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर पोलीस यंत्रणा सतर्क; अतिरिक्त पोलीस महासंचालक विजय कुमार सिंग यांची बेळगावला भेट

Spread the love  वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसोबत कायदा व सुव्यवस्थेचा घेतला आढावा बेळगाव : पुढील महिन्यात …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *