






निपाणी (वार्ता) : पट्टणकुडी हद्दीतील दाइंगडे मळा येथे प्रधानमंत्री आवास योजना आणि राजीव गांधी गृह निर्माण योजनेअंतर्गत निवासी संकुल बांधण्यात आले आहे. त्याला दिवंगत आमदार काकासाहेब पाटील यांचे नाव देण्यात यावे. शिवाय तेथे त्यांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यासाठी सरकारने निधी मंजूर करावा, यासह विविध मागण्यांचे निवेदन निपाणी तालुका ब्लॉक काँग्रेस प्रचार समितीचे अध्यक्ष संजय कांबळे त्यांनी तहसीलदार सुरेश मुंजे यांना दिले.
नियोजनातील माहिती अशी, निपाणी भागाच्या विकासात दिवंगत माजी आमदार काकासाहेब पाटील यांचे योगदान महत्त्वपूर्ण आहे. त्यांची स्मृती जपण्यासाठी त्यांचा पूर्णाकृती पुतळा उभारावा. गांधी रुग्णालयात तज्ज्ञ डॉक्टरांची नियुक्ती करावी.
जुन्या पी. बी. रोडला छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव द्यावे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक ग्रंथालयाच्या इमारतीला मंजुरी मिळावी. ग्रामीण भागात बस सेवा वाढवून विद्यार्थी व प्रवाशांची गैरसोय दूर करावी. पदवी महाविद्यालये स्थापन करावे, यासह विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले. यावेळी महिला आणि बालविकास अधिकारी सुप्रिया जाडगे, सुप्रिया पाटील, गटशिक्षणाधिकारी महादेवी नाईक, सुदीप चौगुला यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta