






दुःखाच्या प्रसंगी शोकाकुल कुटुंबीयांची फरफट
बेळगाव : सार्वजनिक सेवांमधील असुविधांचा फटका नागरिकांना जिवंतपणी तर बसतोच; मात्र मृत्यूनंतरही स्मशानभूमीत गैरसोयींचा सामना करावा लागत असल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. सदाशिवनगर स्मशानभूमीत अंत्यसंस्कार पार पडल्यानंतर मृत व्यक्तीच्या नातेवाईकांना घरी सोडण्यास नकार देत महानगरपालिकेच्या शववाहिनी चालकाने वाहनासह तेथून पळ काढला. चालकाच्या या बेजबाबदार आणि असंवेदनशील वर्तनामुळे आधीच दुःखात असलेल्या कुटुंबीयांना स्मशानभूमीतून घरी जाण्यासाठीही धावपळ करावी लागली.
टेंगिनकेरी गल्ली येथील एका नागरिकाचे सोमवारी निधन झाले. अंत्ययात्रेसाठी कुटुंबीयांनी महानगरपालिकेची शववाहिनी बोलावली होती. त्यानुसार मृतदेह सदाशिवनगर स्मशानभूमीत नेण्यात आला. अंत्यसंस्काराची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर कुटुंबीय आणि नातेवाईकांना घरी पोहोचवण्याची अपेक्षा होती. मात्र, अंत्यविधी संपताच आपली ड्युटी संपल्याचे कारण पुढे करत चालकाने नातेवाईकांना घरी सोडण्यास नकार दिला. कोणतीही पर्यायी व्यवस्था न करता त्याने वाहनासह तेथून काढता पाय घेतला.
आधीच जवळच्या व्यक्तीच्या निधनाने कुटुंबीय दुःखात असताना चालकाच्या या आडमुठ्या भूमिकेमुळे त्यांची मोठी गैरसोय झाली. स्मशानभूमीतून घरी जाण्यासाठी अखेर नातेवाईकांना स्वतःच्या खिशातून पैसे खर्च करून पर्यायी वाहनाची व्यवस्था करावी लागली. दुःखाच्या प्रसंगी आधार देण्याऐवजी महापालिकेच्या सेवकाकडूनच अशी वागणूक मिळाल्याने संताप व्यक्त होत आहे.
महापालिकेच्या सेवेची जबाबदारी नेमकी कोणाची?
सार्वजनिक सेवेत कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांकडून किमान माणुसकी आणि संवेदनशीलतेची अपेक्षा असते. विशेषतः मृत्यूच्या प्रसंगी कुटुंबीयांना सहकार्य करणे गरजेचे असताना, ड्युटी संपल्याचे कारण देत त्यांना स्मशानभूमीतच सोडून जाण्याचा प्रकार गंभीर आहे. शववाहिनी सेवेच्या नावाखाली नागरिकांची अशी फरफट होत असेल, तर या सेवेचा उपयोग तरी काय, असा सवाल उपस्थित होत आहे.
महानगरपालिका प्रशासनाने या घटनेची तातडीने चौकशी करून संबंधित चालकावर कारवाई करावी. तसेच शववाहिनी सेवेच्या जबाबदाऱ्या स्पष्ट करून अंत्यविधीसाठी येणाऱ्या कुटुंबीयांना आवश्यक वाहतूक सुविधा मिळेल, याची खात्री करावी, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.
Belgaum Varta Belgaum Varta