






प्रा. वैदेही जाधव; बेळवट्टीत दहावी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन
बेळगाव : परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांनी अनावश्यक ताण न घेता योग्य नियोजन, नियमित अभ्यास आणि आत्मविश्वासाच्या बळावर परीक्षेला सामोरे जावे, असे मार्गदर्शन प्राध्यापिका वैदेही जाधव यांनी केले.
विश्वभारत सेवा समिती संचलित माध्यमिक विद्यालय, बेळवट्टी येथे दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी ‘परीक्षेला आत्मविश्वासाने कसे सामोरे जावे’ या विषयावर मार्गदर्शनपर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी त्या बोलत होत्या. विद्यार्थ्यांनी अभ्यासाचे नियोजन करताना प्रत्येक विषयाला पुरेसा वेळ द्यावा. नियमित अभ्यासाची सवय लावून घेत ठरविलेल्या वेळापत्रकाची काटेकोर अंमलबजावणी करावी. केवळ पाठांतरावर अवलंबून न राहता अभ्यासलेल्या विषयांचे मनन, चिंतन आणि उजळणी करावी. कठीण वाटणाऱ्या विषयांकडे दुर्लक्ष न करता त्यांचा नियमित सराव करावा. परीक्षेच्या वेळी मन शांत ठेवून आत्मविश्वासाने प्रश्नांची उत्तरे लिहावीत, असे त्यांनी सांगितले. तसेच इंग्रजी आणि सामाजिक शास्त्र विषयांचा अभ्यास अधिक प्रभावीपणे कसा करावा, याबाबतही त्यांनी विद्यार्थ्यांना उपयुक्त टिप्स दिल्या.
अभ्यासातील अडचणी, परीक्षेची तयारी, वेळेचे नियोजन तसेच विविध विषयांशी संबंधित प्रश्न विद्यार्थ्यांनी उपस्थित केले. प्रा. जाधव यांनी प्रत्येक प्रश्नाला समर्पक उत्तरे देत विद्यार्थ्यांच्या शंकांचे निरसन केले. त्यामुळे व्याख्यानाला संवादात्मक स्वरूप प्राप्त झाले. विद्यार्थ्यांना आपल्या अडचणी मांडण्याची आणि थेट मार्गदर्शन मिळविण्याची संधी मिळाली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे मुख्याध्यापक तगनकर होते. यावेळी शिक्षक अमोल होनगेकरसह इतर शिक्षक आणि विद्यार्थी उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta