बेळगाव : नवरात्रोत्सव आणि दसर्या सुट्टीच्या निमित्ताने प्रवाशांची आंतर राज्य आणि जिल्हा अंतर्गत ये-जा वाढणार असल्यामुळे या काळात अतिरीक्त 300 बसेस उपलब्ध करून देण्याचा निर्णय वायव्य कर्नाटक राज्य परिवहन महामंडळाने घेतला आहे.
मागील दोन वर्षात कोरोनामुळे परिवहन महामंडळास मोठा आर्थिक तोटा सहन करावा लागला आहे. हा तोटा भरून काढण्यासाठी परिवहन महामंडळाकडून आता सण आणि उत्सवाच्या दिवशी विशेष बससेवा उपलब्ध करून दिली जात आहे. पुढील महिन्यात 14, 15 व 19 ऑक्टोबर रोजी सार्वजनिक सुट्टी आहे.
येत्या 15 ऑक्टोबर रोजी विजयादशमी तर 19 ऑक्टोबर रोजी ईद-ए-मिलाद सण असल्यामुळे बेळगावात कार्यरत असलेला दक्षिण कर्नाटकातील नोकरवर्ग आपल्या गावाकडे परतणार आहे. त्यामुळे बेळगाव मध्यवर्ती बस स्थानकातून बंगळूर, मंगळूर, म्हैसूर या भागांसह तेलंगणा व गोवा राज्यात प्रवाशांची ये-जा वाढणार आहे. त्यामुळे बंगळूर आणि मंगळूर मार्गावर सुट्टीच्या काळात अतिरिक्त बस सेवा उपलब्ध करून दिली जाणार आहे. परिवहन मंडळाने बेळगाव, बागलकोट, चिक्कोडी, हुबळी या विभागातून अतिरिक्त बसेस उपलब्ध करून दिल्या आहेत. बेळगाव मध्यवर्ती बसस्थानकावरून या बसेस धावणार आहेत. गोवा तेलंगणा आणि राज्यातील इतर भागांसाठी अतिरिक्त बस सेवा उपलब्ध करून देताना ऑनलाइन बुकिंगही सुरू करण्यात आले आहे.
महाराष्ट्रातून कर्नाटकात प्रवेश करणार्यांसाठी कोरोना चांचणी अहवाल सक्तीचा असल्यामुळे महाराष्ट्र-कर्नाटक आंतरराज्य बस सेवेवर परिणाम झाला असून या मार्गावर परिवहन महामंडळाने कोणतीही अतिरिक्त सेवा उपलब्ध करून दिलेले नाही.
Check Also
सौंदत्ती यल्लमा डोंगरावर येळ्ळूरच्या भाविकांच्या वतीने सामूहिक परड्या भरण्याचा कार्यक्रम
Spread the love येळ्ळूर : परंपरेनुसार शांकभरी पौर्णिमेला प्रतिवर्षी येळ्ळूरच्या भाविकाकडून सौंदत्ती यल्लमा डोंगरावर सामूहिक …