बेळगाव : कर्नाटक सरकारच्या हिवाळी अधिवेशनाच्या निषेधार्थ येत्या 19 डिसेंबर रोजी आयोजित मराठी भाषिकांचा महामेळावा यशस्वी करण्याचा निर्धार समितीच्या बैठकीत करण्यात आला.
महामेळाव्यासंदर्भात आज मंगळवारी दुपारी मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीची महत्वपूर्ण बैठक मराठा मंदिर येथे
कार्याध्यक्ष माजी आमदार मनोहर किणेकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.
महाराष्ट्रातील सर्व पक्षांच्या अध्यक्षांना आपले प्रतिनिधी पाठविण्यासंदर्भात विनंती करण्यात आली आहे. मात्र अद्यापपर्यंत कोणी होकार आलेला नाही, परंतु पोलिसांना आम्ही अशाप्रकारे महाराष्ट्रातील राजकीय पक्षांचे प्रतिनिधी येणार असल्याची कल्पना दिली असल्याची माहिती बैठकीत देण्यात आली.
अध्यक्षीय भाषणात मनोहर किणेकर यांनी कर्नाटक सरकारचे हिवाळी अधिवेशन सीमावासियांच्या विरोधात आहे. त्यांच्या जखमेवर मीठ चोळण्यासाठी आहे. कर्नाटक सरकार आमचे घटनात्मक हक्क डावलून कन्नड सक्ती करत आहे. मराठी भाषा संपवण्याचा प्रयत्न करत आहे. त्यालाच आम्ही या महामेळाव्याच्या माध्यमातून विरोध दर्शवण्याचे काम करत आहोत असे सांगून यावर्षीचा हा महामेळावा यशस्वी करण्यासाठी कोणत्याही प्रकारची कचुराई केली जाणार नाही असे स्पष्ट केले. बैठकीच्या प्रारंभी ज्येष्ठ मराठी अभिनेते दिवंगत विक्रम गोखले यांच्यासह कै. सुलोचना चव्हाण, कै. डॉ. कोतापल्ले तसेच महाराष्ट्र एकीकरण समितीशी संबंधित दिवंगताना श्रद्धांजली वाहण्यात आली. मनोहर किणेकर यांच्यासह सरचिटणीस मालोजीराव अष्टेकर, प्रकाश मरगाळे, राजू पाटील, ॲड. राजाभाऊ पाटील, यशवंत बिर्जे, धनंजय पाटील, रणजीत चव्हाण -पाटील, एम. जी. पाटील इत्यादींनी बैठकीतील चर्चेत भाग घेतला. माजी नगरसेवक रणजीत चव्हाण -पाटील यांनी सर्वांचे स्वागत केले. बैठकीस मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे जनसंपर्कप्रमुख विकास कलघटगी यांच्यासह अन्य पदाधिकारी सदस्य तसेच बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समिती आणि खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.