महाराष्ट्र – कर्नाटकाचे मुख्यमंत्री रहाणार उपस्थित
बंगळूर : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दीर्घकाळ रेंगाळत पडलेल्या महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नावर चर्चा करण्यासाठी दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची उद्या (ता.१४) नवी दिल्ली येथे बैठक बोलाविली आहे. त्यामुळे कर्नाटकाचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई बुधवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेण्यासाठी नवी दिल्लीला रवाना होतील, असे मुख्यमंत्री कार्यालयातील सूत्रांनी सांगितले.
कर्नाटक-महाराष्ट्र सीमावादात केंद्र सरकार हस्तक्षेप करण्याची ही पहिलीच वेळ आहे. बोम्मई बुधवारी हुबळीमार्गे दिल्लीला रवाना होणार असून, सायंकाळी त्यांची शहा यांच्याशी भेट होणार आहे.
गेल्या आठवड्यात बोम्मई यांनी कर्नाटकचे खासदार सोमवारी शाह यांची भेट घेणार असल्याचे सांगितले होते. पण गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांच्या शपथविधीला उपस्थित राहण्यासाठी शहा गुजरातमध्ये होते, त्यामुळे त्यांची भेट होऊ शकली नाही.
भाजपच्या एका खासदाराने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले की, त्यांना कोणताही संदेश मिळाला नाही आणि परवानगी मिळाल्यास ते शाह यांना भेटायला येतील. “हे आमच्या राज्याबाबत आहे, आणि आम्ही आमच्या मागण्यांसाठी उभे राहू, असे ते पुढे म्हणाले. बेळगाव शहर आणि विविध जिल्ह्यांतील शेकडो गावांवर महाराष्ट्र हक्क सांगत आहे, तर महाराष्ट्रातील अनेक गावे कर्नाटकात विलीन होऊ इच्छित आहेत. मात्र, हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयासमोर आहे.
महाराष्ट्राच्या खासदारांनी नुकतीच शहा यांची भेट घेऊन सीमाप्रश्नी हस्तक्षेप करण्याची मागणी केली होती. कर्नाटकाचे मुख्यमंत्री बोम्मई आणि कर्नाटकातील कांही नेते सीमाप्रश्नावरून रोज एक वक्तव्य करून गोंधळ घालण्याचा प्रयत्न करीत असल्याच्या गोष्टीकडे महाराष्ट्राच्या शिष्टमंडळाने केंद्रीय गृहमंत्र्यांचे लक्ष वेधले व त्यांना समज देण्याची मागणी केली होती. या प्रश्नात केंद्राने हस्तक्षेप करून सीमाप्रश्न सोडविण्याची मागणीही शिष्टमंडळाने केली होती.
दरम्यान, केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी इतर खासदारांसह शाह यांची भेट घेण्याचा काल प्रयत्न केला. शहा गुजरातमध्ये व्यस्त असल्याने ते त्यांना भेटू शकले नाहीत, असे सूत्रांनी सांगितले.
भुमिका स्पष्ट करणार
कर्नाटक-महाराष्ट्र सीमा वादावर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी उद्या (ता. १४) दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची बैठक बोलावली असल्याचे सांगून या बैठकीत राज्याची भूमिका स्पष्ट करणार असल्याचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई म्हणाले.
चामराजनगरला रवाना होण्यापूर्वी मंडक्कली विमानतळावर पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, केंद्रीय गृहमंत्री सीमाप्रश्नावर चर्चा करणार आहेत. दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक बोलावण्यात आली आहे. या बैठकीचा मुख्य मुद्दा हा सीमावाद आहे. आमची भूमिका काय आहे ते उद्याच्या बैठकीत सांगू. राज्य पुनर्रचना कायद्यानंतर काय प्रक्रिया झाल्या आहेत, सध्याच्या सर्वोच्च न्यायालयातील खटल्यापर्यंतची सर्व माहिती मी गृहमंत्र्यांना देत आहे. संविधानात काय म्हटले आहे, कायदा काय सांगतो. २००४ मध्ये जे काही घडले ते सर्वोच्च न्यायालयाने घेतले आहे, हे आपण गृहमंत्र्यांना पटवून देऊ, असे ते म्हणाले.
अलिकडच्या काळात सीमावादावरून दोन्ही राज्यात तणावाचे वातावरण आहे. सीमाप्रश्नी महाराष्ट्र सरकारने सर्वोच्च न्यायालयाचे वकील व सीमाभागातील मराठी जनतेशी संपर्क ठेवण्यासाठी दोन समन्वय मंत्र्यांची नियुक्ती केल्यामुळे कर्नाटकाचे मुख्यमंत्री भलतेच खवळले. त्यावरून महाराष्ट्राला डिवचण्यासाठी त्यानी सोलापूर, अक्कलकोट आदी जिल्हे कर्नाटकात जोडण्याची मागणी केली. कर्नाटकातील कन्नडीगानी महाराष्ट्रातील वाहनांवर दगडफेक केली. त्याचे पडसाद महाराष्ट्रातही उमटले. त्यातून दोन्ही राज्यातील बसवाहतूक कांही दिवस बंद ठेवावी लागली.
याच पार्श्वभुमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी महाराष्ट्र व कर्नाटकाच्या मुख्यमंत्र्यांची आज बैठक बोलाविली आहे. त्यातून दीर्घ काळ रेंगाळलेल्या सीमाप्रश्नाच्या सोडवणुकीला चालना मिळेल अशी अपेक्षा सीमाभागातील मराठी जनतेत निर्माण झाली आहे.