बेळगाव : बेळगाव परिसरातील सर्व शैक्षणिक, सामाजिक संस्था आणि सर्व राजकीय पक्ष यांच्यातर्फे मंगळवारी सायंकाळी आयोजित शोकसभेमध्ये ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक, महाराष्ट्र एकीकरण समितीचे लढवय्ये नेते, नामवंत वकील, ज्येष्ठ समाजवादी कार्यकर्ते व बेळगाव शाखा अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष दिवंगत ॲड. राम आपटे यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली.
शहरातील कॅम्प येथील ज्योती कॉलेजमध्ये ॲड. राजाभाऊ पाटील यांच्या अध्यक्षतेखाली या शोकसभेचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी व्यासपीठावर ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अशोक देशपांडे, माजी प्राचार्य आनंद मेणसे, माजी महापौर मालोजीराव अष्टेकर आणि मराठी विद्यानिकेतन शाळा सुधारणा समितीचे अध्यक्ष सुभाष ओऊळकर उपस्थित होते. प्रारंभी प्रास्ताविकानंतर व्यासपीठावरील मान्यवरांच्या हस्ते दिवंगत ॲड. राम आपटे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर उपस्थित सर्वांनी दोन मिनिटे मौन पाळून त्यांना श्रद्धांजली अर्पण केली.
यावेळी प्रा. आनंद मेणसे, मालोजीराव अष्टेकर, अशोक देशपांडे, शिवाजी कागणीकर आदींची ॲड. राम आपटे यांच्या काही आठवणी सांगून त्यांच्या कार्याचा गौरव करणारी श्रद्धांजलीपर भाषणे झाली. ॲड. राजाभाऊ पाटील यांच्या अध्यक्षीय भाषणाने शोकसभेची सांगता झाली. सभेला बेळगाव परिसरातील सर्व शैक्षणिक, सामाजिक संस्था आणि सर्व राजकीय पक्षांचे पदाधिकारी, प्रतिनिधी, वकील मंडळी, सामाजिक कार्यकर्ते, आपटे कुटुंबीयांचे हितचिंतक आणि नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते.