बेळगाव : तीन महिन्यांची गरोदर असलेल्या महिलेचा खून करून तिने आत्महत्या केल्याचा बनाव करणाऱ्या सासरच्या लोकांना अटक न करून हे प्रकरण दडपू पाहणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांना निलंबित करण्याची मागणी करत कर्नाटक रक्षण वेदिके स्वाभिमानी गट आणि न्यू वंटमुरी ग्रामस्थांनी आज बेळगाव जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून निदर्शने केली. यावेळी त्यांनी बेळगावचे अपर जिल्हाधिकारी व पोलीस आयुक्तांना निवेदन दिले.
करवे स्वाभिमानी गट जिल्हाध्यक्ष ईश्वरगौडा पाटील, कामगार नेते ऍड. एन. आर. लातूर यांच्या नेतृत्वाखाली न्यू वंटमुरी ग्रामस्थ व कार्यकर्त्यानी आज चन्नम्मा चौकातील कन्नड साहित्य भवनापासून घोषणा देत जिल्हाधिकारी कार्यालयावर निषेध मोर्चा काढला. न्यू वंटमुरी गावातील गौरम्मा मंजुनाथ कोण्णूर या तीन महिन्यांची गरोदर असलेल्या 22 वर्षीय महिलेची तिच्या सासरच्यांनी हत्या केली. त्यानंतर तिचा मृतदेह गळफास घेतलेल्या स्थितीत ठेवून तिने आत्महत्या केल्याचा देखावा निर्माण केला. तिच्या आई-वडिलांनी फिर्याद देऊन आणि या घटनेला ८ दिवस उलटूनही, काकती पोलिसांनी काहीच कारवाई केलेली नाही असा आरोप मोर्चेकऱ्यांनी केला.
यावेळी प्रसारमाध्यमांना माहिती देताना ऍड. एन. आर. लातूर यांनी सांगितले की, हळेहोसूर गावातील वरद कुटुंबातील धाकटी मुलगी गौरम्मा हिचा विवाह तीन वर्षांपूर्वी न्यू वंटमुरी गावातील मंजुनाथ यल्लाप्पा कोण्णूर याच्याशी झाला होता. लग्न झाल्यापासून तिच्या पतीचे कुटुंब गौरम्माला त्रास देत होते. दरम्यान, छळाला कंटाळुन अनेकवेळा ती घरी आल्यावर तिचा नवरा आणि दीर येऊन तिला परत घेऊन जायचे. त्यांना दीड वर्षाचा मुलगा होता आणि गौरम्मा तिच्या दुसऱ्या बाळासाठी तीन महिन्यांची गरोदर होती. शनिवारी सकाळी गौरम्मा हिला पती मंजुनाथ, सासरे यल्लाप्पा सिद्धप्पा कोन्नूर आणि सासू रेणुका यल्लाप्पा कोन्नूर यांनी बेदम मारहाण केली. त्यानंतर तिचा खून करून फासावर लटकवून तिने आत्महत्या केल्याचा बनाव केला. याबाबत गौरम्माच्या घरच्यांनी २४ डिसेंबर रोजी तक्रार देऊनही पोलिसांनी आरोपीना अटक केली नाही. त्यामुळे ते खुलेआम फिरत आहेत. त्यामुळे दोन दिवसांत आरोपीना अटक करून फाशीची शिक्षा द्यावी आणि संबंधित पोलीस अधिकाऱ्यांना निलंबित करावे अशी मागणी ऍड. लातूर यांनी केली.
गौरम्माची आई अक्कमा हिने सांगितले की, लग्न झाल्यापासूनच मुलगीचा सासरचे लोक अतोनात छळ करत होते. तरीही पतीचे घर सोडून आल्याचा ठपका नको म्हणून आणि मुलाच्या ओढीने ती पुन्हा नांदायला जायची तिचा तिच्या सासरच्यांनीच घात केला असून, त्यांना त्वरित अटक करून फाशी देण्याची मागणी या मातेने केली. दरम्यान, पुरावे नष्ट करण्यासाठी काही जणांनी योजना आखून घराला आग लावली आणि आमच्याविरुद्ध उलट फिर्याद दाखल केली, असा आरोप खून झालेल्या महिलेच्या कुटुंबीयांनी केला आहे. कर्नाटक रक्षण वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी घोषणा देत काकती पोलिसांचा निषेध केला. हत्येतील आरोपींना त्वरित बेड्या ठोकण्याची मागणी त्यांनी केली. गौरम्माच्या खुनाचे प्रकरण दडपून टाकण्यासाठी आरोपींशी हातमिळवणी करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांना निलंबित करण्याची मागणी त्यांनी केली. याबतचे निवेदन शहर पोलीस आयुक्त डॉ. एम. बी. बोरलिंगय्या आणि बेळगावच्या अपर जिल्हाधिकाऱ्यांना दिले.