मंड्या : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आज (शुक्रवार) कर्नाटकातील मंड्या येथे सभेत बोलताना आगामी वर्षात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजवला आहे. यावेळी त्यांनी काँग्रेस आणि जेडीएस वर टीका करत, त्यांना भ्रष्ट आणि परिवारवादी पार्टी म्हटलं आहे.
कर्नाटकातील मंड्यामध्ये एका सभेस संबोधित करताना अमित शाह म्हणाले की, मी २०१८ मधील निवडणुकीची सुरुवात याच जिल्ह्यामधून केली होती. इथून एक मूठ धान्य मागून काँग्रेस सरकारच्या काळात ज्या शेतकऱ्यांवर अन्याय झाला होता, भाजपाने त्यांना न्याय मिळवून देण्याची शपथ घेतली होती. कर्नाटकच्या जनतेने आम्हाला सर्वात मोठा पक्ष बनवून येथे सरकार स्थापन करण्याची संधी दिली.
अमित शाह पुढे म्हणाले की, आम्ही जेडीएस आणि काँग्रेसचं सरकार पाहीलं आहे. काँग्रेसच्या काळात कर्नाटक दिल्लीसाठी एटीएम बनते आणि जेडीएस सरकारच्या काळात, एका परिवारासाठी एटीएम बनते. दोघांनी नेहमीच भ्रष्टाचाराच्या माध्यमातून या राज्याच्या विकासात अडसर निर्माण केला आहे.
अमित शाह यांच्या सभेच्या अगोदर कर्नाटकचे सहकार मंत्री एस टी सोमशेकर यांनी प्रसारमाध्यमांना माहिती देताना सांगितलं होतं की, “मंड्या येथील सभेमुळे भाजपाला बळ मिळेल. आगामी निवडणुकीत मंड्या जिल्हा जेडी(एस) आणि काँग्रेसचा बालेकिल्ला राहणार नाही. त्यांनी आधीच मंड्या लोकसभा मतदारसंघ गमावला आहे.” अपक्ष खासदार सुमलता अंबरीश हे सध्या या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करत आहेत.
“आगामी निवडणुकीत मंड्या, म्हैसूर, चामराजनगर, हसन आणि रामनगरा जिल्ह्यात जास्तीत जास्त जागा जिंकण्याचा भाजपाचा प्रयत्न आहे. या भागात पक्ष मजबूत करण्यावर विशेष लक्ष केंद्रित केलं जात आहे,” अशी माहितीही सोमशेकर यांनी दिली होती.