बेळगाव : गॅस गळतीने घराला आग लागल्याची घटना रविवारी सायंकाळी कसाई गल्ली येथे घडली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, गृहोपयोगी वस्तू जळून खाक झाल्या आहेत. विनायक बारटक्के व त्यांचे कुटुंबीय भाडोत्री रहात असलेल्या घराला रात्री 7.30 वाजण्याच्या सुमारास गॅस गळतीने आग लागली. कौलारू घर असल्यामुळे छत पूर्णपणे जळाले आहे. फ्रिज, कपडेलत्ते, धान्य जळाले आहे. प्रसंगावधान राखून कुटुंबीय घराबाहेर गेल्याने जीवितहानी झाली नाही.
घटनेची माहिती समजताच अग्निशमन दलाचे अधिकारी व्ही. एस. टक्केकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी पाण्याच्या बंबासह घटनास्थळी धाव घेतली. पाण्याचे फवारे मारून आग आटोक्यात आणण्यात आली. या घटनेत आर्थिक हानी झाली आहे.