बेळगाव : बेळगाव ग्रामीण भागात लोकांच्या भोळेपणाचा फायदा घेऊन सरकारी कर्मचाऱ्यांना हाताशी धरून निवडणूक प्रचार होत आहे. लिंबू-नारळ इत्यादी वस्तूवर लोकांचा हात ठेवून शपथ घेऊन आतापासूनच मतांची याचना करीत काही राष्ट्रीय पक्षांची लोकं फिरत आहेत. प्रशासनाने याच्यावर कार्यवाही करून संबंधितांवर कडक शासन करावे. अन्यथा लोकांनी संतप्त होऊन चुकीचे पाऊल उचलले तर त्याला प्रशासन जबाबदार राहील.
गावपातळीवील प्रचाराचे फंडे वेगळे असतात. गावातील राजकारणापूर्वी पदाधिकाऱ्यांच्या जाहीर सभा होत होत्या. ध्वनिक्षेपकावरून प्रचार केला जात होता, बैलगाड्यांचाही प्रचारात वापर होत होता; परंतु आता यामध्ये आधुनिकता आली आहे. सध्या सोशल मीडियाचा वापर प्रचारासाठी होत आहे. कॉर्नरसभा, प्रत्येक घराघरात जाऊन प्रचार केला जात आहे. जेवणाच्या मोठ्या पार्ट्या सुरू असल्याची चर्चा आहे. मात्र या पलिकडे जाऊन ग्रामीण भागातील गावकरांची चौकी असते तेथे गावातील अनेक विषयांवर चर्चा होते, निर्णय घेतले जातात. काही पक्षांनी आता आपली ताकद कायम राहावी यासाठी नव्या धार्मिक फंड्याचा वापर सुरू केला आहे. काही पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी गावकर्यांना हाती धरून गावात स्पर्धा आहेत म्हणून लाॅटरीच्या आमिषाने त्यांच्या घरोघरी जाऊन नारळावर हात ठेवून मतदान करण्याची शपथ घेतली जात असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे. यामुळे अनेक ग्रामीण भागातील मतदार शपथीला घाबरून मतदान करतात. ही मतदारांची धार्मिक बाबींआधारे फसवणूक जिल्हा प्रशासनाने थांबवण्याची गरज आहे.