Thursday , May 28 2026
Breaking News

बेळगाव-गोवा महामार्गावर भीषण अपघात; 2 ठार

Spread the love

 

बेळगाव : बेळगाव-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील रामनगर-अनमोड घाट मार्गावर गवेगाळी क्रॉस येथे बुधवारी मध्यरात्री कार आणि टेम्पो यांच्यात समोरासमोर भीषण धडक होऊन दोन जण जागीच ठार, तर तिघेजण गंभीर जखमी झाल्याची दुर्दैवी घटना घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, आंध्र प्रदेश पासिंगची कार (एपी 02 बीएएन 0292) गोव्याहून कर्नाटकच्या दिशेने येत होती. त्याचवेळी कोंबड्यांनी भरलेला टेम्पो (जीए 09 यू 6990) गोव्याच्या दिशेने जात होता. गवेगाळी क्रॉस येथे कार चालकाने समोरील वाहनाला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला असता समोरून येणाऱ्या भरधाव टेम्पोची जोरदार धडक बसली.

धडक इतकी भीषण होती की कार आणि टेम्पोच्या पुढील भागाचा अक्षरशः चुराडा झाला. टेम्पोतील कोंबड्याही रस्त्यावर विखुरल्या गेल्या. या अपघातात कारमधील दोघेजण जागीच ठार झाले असून ते आंध्र प्रदेशातील रहिवासी असल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली आहे.

अपघातात कार चालकासह टेम्पोमधील नवरा-बायको गंभीर जखमी झाले असून त्यांना तातडीने उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जखमींपैकी काहींची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते.

घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी आणि प्रवाशांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले. अपघातामुळे काही काळ महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून वाहतूक सुरळीत केली.

ही दुर्घटना बुधवारी रात्री दीडच्या सुमारास घडल्याचे सांगितले जात असून सततचा पाऊस, घाट परिसरातील धोकादायक वळणे आणि वेगवान वाहनचालन यामुळे या मार्गावर अपघातांचे प्रमाण वाढत असल्याची चर्चा स्थानिकांमध्ये सुरू आहे. याप्रकरणी रामनगर पोलीस ठाण्यात नोंद झाली असून पुढील तपास सुरू आहे.

About Belgaum Varta

Check Also

सौंदत्ती यल्लम्मा मंदिराच्या कायापालटासाठी २१५ कोटी मंजूर; भाविकांसाठी अत्याधुनिक सुविधांचा विकास

Spread the love  बेळगाव : लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या सौंदत्ती येथील श्री रेणूका यल्लम्मा क्षेत्राच्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *