
बेळगाव : पावसाळ्यात पावसाचे पाणी बेळ्ळारी नाल्यातून न जाता परिसरातील शेत जमिनीमध्ये जाते. त्यामुळे दरवर्षी शेतकऱ्यांचे पीक पाण्याखाली जाऊन शेतकऱ्यांना आर्थिक संकटाला सामोरे जावे लागत आहे. संभाव्य परिस्थिती ओळखून नवनिर्वाचित सरकारने शेतकऱ्यांच्या पिकाचे संरक्षण संबंधित अधिकाऱ्यांनी करावे, असे आदेश दिले आहेत. त्यानुसार बेळ्ळारी नाल्याची सफाई करण्यात येत आहे पण ही नालेसफाई नसून शेतकऱ्यांच्या डोळ्याला पाणी पुसण्याचे काम प्रशासन करीत असल्याचे दिसून येत आहे.
बेळ्ळारी नाल्याची सफाई करताना जेसीबीच्या साहाय्याने नाल्यातून गाळ काढून जलपर्णी काढली असती तर पावसाच्या पाण्याचा निचरा बेळ्ळारी नाल्यातून व्यवस्थित झाला असता व शेतकऱ्यांची थोडीबहुत पिके वाचली असती. मात्र सध्या सुरू असलेली नालेसफाई म्हणजे शेतकऱ्यांची फसवणूक आहे असेच म्हणावे लागेल. कारण सध्या ज्या पद्धतीने नाल्याचा बांध बांधने सुरू आहे ते पाहता अतिवृष्टी झाली की बंधावरची माती पुन्हा शेतात पसरणार व शेतकऱ्यांचे पीक पाण्याखाली जाणार आहे व पुन्हा शेतकरी आर्थिक संकटात सापडणार आहे तेव्हा संबंधित अधिकाऱ्यांनी बेळ्ळारी नाल्यातील गाळ व जलपर्णी काढल्यास पाण्याचा निचरा होण्यास मदत होईल. त्याचबरोबर येळ्ळूर रोड बेळ्ळारी पुलाजवळील अनगोळ शिवारात नाल्याच्या तोंडावर मातीचा भराव टाकल्यामुळे यळ्ळूर, मजगाव, अनगोळ शिवार तसेच वडगाव, चन्नम्मा नगर, टिळकवाडी परिसरातील पावसाचे पाणी देखील नाल्यामध्येच येते. हे सर्व पाणी बेळ्ळारी नाल्यातून परिसरातील शेत जमिनीमध्ये शिरल्यामुळे पिकांचे नुकसान होत आहे. जिल्हाधिकारी व संबंधित अधिकाऱ्यांनी बेळ्ळारी नाल्यावर प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी करून पाण्याचा निचरा होण्यासाठी मार्ग मोकळा करण्यात यावा, अशी वडगाव, अनगोळ परिसरातील शेतकऱ्यांनी मागणी केली आहे.
Belgaum Varta Belgaum Varta